सत्यशोधकी जाणीव-नेणीवामधून साकारलेलं एक फोटो प्रदर्शन….

– प्रा. प्रतिमा परदेशी 

--

                                                         प्रियांका सातपुते यांनी काढलेली छायाचित्रे.

     आपल्याकडे फोटो हा सामान्य माणसांच्या आयुष्यातला दुर्मिळ क्षण होता हे आता कदाचित सांगूनही खरे वाटणार नाही. कारण आजमितीला लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आहे आणि हा मोबाईल फक्त संवाद साधण्याचे साधन राहिलेला नाही. त्यावर बरेच उद्योग केले जातात. हे उद्योग दोन्ही प्रकारचे आहेत. काही उपयुक्त, सयुक्तिक, फायद्याचे आहेत, तर काही अक्षरशः समाजविघातक. भारतासारख्या जातीची विषमता असणार्या देशात फोटो काढण्याची सुविधा उपलब्ध झाली ती सुरुवातीच्या काळात विशिष्टांसाठीच! सामन्यांसाठी ती मौजच होती. भीम शाहीर वामनदादा कर्डक यांनी स्त्रियांच्या आयुष्यात साजणासोबत फोटो काढण्याचे काय महत्त्व असते, तिच्या काय भावना त्या फोटोशी जोडल्या गेलेल्या सतत या संबंधी एक गीत लिहिले होते-
खाण, लेण, सोनं, नाणं नको जिलबी लाडू,
चल सजणा फोटू काढू…
काळ बदलत गेला आणि फोटो काढणारे, फोटो काढून घेणारे याच्या संख्येत गुणात्मक वाढ होत गेली. जागतिकीकरणाच्या युगात फोटो काढण्याच्या व्यवसायाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. फुड फोटोग्राफी, वाईल्ड फोटोग्राफी इ.इ. प्रकारचे फोटोग्राफर आपल्या आवडी व गरजांनुसार कामास लागले. काहींनी व्यवसाय, तर काहींनी हा छंद म्हणून जोपासला. या सर्व बदलत्या परिस्थितीत फोटो काढणारी व्यक्ती कोण आहे? ती कोणाचे, कशाचे फोटो काढते? हे मुद्दे फार महत्त्वाचे ठरतात. कारण फोटो काढणे ही एक कला आहे. कला, साहित्य, संस्कृतीचा इतिहास, फोटो काढणार्यांच्या जाणीव-नेणीवा या त्या व्यक्तीच्या फोटोग्राफीवर प्रभाव आणि परिणाम करीत असतात. फोटो नेमका कशाचा काढायचा? का काढायचा? त्यात नेमके कोणते सौंदर्य आहे? हेही त्या व्यक्तीच्या जाणीव-नेणीवा निर्धारित करीत असतात. भारतासारख्या जातिवर्गस्त्रीदास्यामूलक समाजात व्यक्तीच्या जाणीव-नेणीवांवर जातीवर्ग आणि लिंग प्रभाव गाजवताना दिसते.

      माणसाच्या जाणीवा बदलू शकतात. माणसे जितकी नव्या प्रगत उत्पादन साधनाच्या आणि पद्धतीच्या सान्निध्यात येतात, त्याच्याशी त्यांचा संबंध येतो तसतशा व्यक्तीच्या जाणीवा बदलत जातात, त्यांचा विकास होत जातो हे सूत्र मार्क्सवादात सांगितले गेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘खेडी सोडा, शहराकडे चला’ हा विचारही या संदर्भात किती महत्त्वाचा होता हे लक्षात येते. आपल्याकडे उत्पादन साधनेच जातीच्या मालकीची होती. परिणामी उत्पादनसंबंधही जातिप्रधान राहिले. ब्रिटीश आगमनानंतर आलेल्या भांडवलशाहीच्या परिणामी त्यात काहीशा बदलाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु तेव्हापासून अद्यापही व्यवस्था अंताची सामाजिक क्रांती न झाल्याने जाणीवप्रायः जाती वर्चस्वाच्या आणि त्यात सामावलेल्या वर्गीय अशा स्वरुपाच्या राहिलेल्या दिसतात. फोटो काढणारी व्यक्ती कोणत्या जातिवर्गातील आहे, ती स्त्री आहे की, पुरुष यावर घेतला जाणारा फोटो, त्याचा दर्जा, त्याची वाहवा किंवा निर्भत्सना किंवा दुर्लक्ष अवलंबून असते. एखाद्या पुरुषाने कॅमेराने क्लिक केलेला निसर्ग आणि स्त्रीने क्लिक केलेला निसर्ग यात जमीन अस्मानाचे अंतर असू शकते आणि त्याचे स्वागत किंवा त्या कडील दुर्लक्षही!

 

       आपल्या कॅमेराला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानून केली जाणारी फोटोग्राफी निराळीच असते! एखादा कलाकार जेव्हा फोटो काढत असतो ती केवळ एक क्लिक नसते. त्या व्यक्तीचा विचार, जीवनाकडे, समाजाकडे, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यातून अभिव्यक्त होत असतो. काही कलाकार एखादी थीम / विषय घेऊन काम करतात. स्त्रिया या थीमवर काम करणार्या फोटोग्राफर्सचे फोटो एकत्रित पाहिले, तर स्त्री म्हणून आजवर त्याच्या घडवलेल्या गेलेल्या प्रतिमा त्यातून व्यक्त होताना दिसतील. मग कोणी शृंगार करणार्या स्त्रिया, कष्ट करणार्या, असाध्य कार्य केलेल्या स्त्रिया, भारतातील वेगवेगळ्या प्रांताचे प्रतिनिधित्व करणार्या स्त्रिया चितारू शकतात. ही कलाकारी करताना त्यांच्या जाणीवा त्यातून व्यक्त होतात. पण काही कलाकार वेगळ्याच धाटणीचे असतात. ते कष्ट करणार्या स्त्रिया चितारताना, त्यांचे फोटो काढताना डोंबारी स्त्रिया, भाकरी थापणार्या स्त्रिया, शेतात लावणी करणार्या स्त्रियांचे फोटो क्लिक करतील. थीम विषय सारखाच पण फोटो वेगळे, नुसते वेगळे नाही, तर गुणात्मकदृष्ट्या वेगळे काढले गेले. याचे कारण फोटोग्राफरची विचारदृष्टी! बुगुबुगु वाजवत भिक्षा मागणे ज्यांना जातिव्यवस्थेने भाग पाडले आहे, अशा जातितील स्त्रिया कष्टच तर करतात ना? हा विचार त्या मागे कार्यरत असतो. वाद्य वाजवणे, शेतीकाम करणे, घरकाम करणे हे उत्पादक श्रमच असतात हा सत्यशोधक स्त्रीवाद त्यांनी फोटोमधून व्यक्त केलेला असतो. अशा फोटोग्राफीत जातिवर्गाच्या आणि स्त्रीवादाच्या जाणीव आणि नेणीवाच तर असतात असे आपण हमखास म्हणू शकतो. अर्थात या सर्व मांडणीचा अर्थ या जाणीवा जन्मजातच असतात, त्यात बदलच येऊ शकत नाहीत असे अजिबातच नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्या विकसित होत जातात. जात जाणीव या जन्माने मिळणार्या जातीतून मुख्यतः घडविल्या जातात हे जरी खरे असले, तरी जातीचा अहंगंड किंवा न्यूनगंड वजा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत त्यावर मात करता येते, केली पाहिजे. जातिव्यवस्थेने उच्चजातीयांत अहंगंड, तर कनिष्ठ जातींना न्यूनगंड दिला आहे. ‘डीकास्ट’ होण्याची प्रक्रिया जितक्या मोठ्या प्रमाणात आत्मसात केली जाईल, जेव्हा स्त्रियांच्या जातिवर्गपुरुषसत्तेने घडविलेल्या प्रतिमा, त्यातील फोलपणा उमगू लागतो तसतसे आपला (स्त्री असो की पुरुष) स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. कनिष्ठ जातीतून आलेल्या स्त्रीपुरुषांवर लादली जाणारी असाह्यता, दुबळेपणा, उरबडवेपणा, नकारात्मकता, किंवा उच्च जातीतील स्त्री पुरुषांना मिळणारी श्रेष्ठता, अहंकार, संरक्षण, सुविधा इ. समजून घेत त्याची चिकित्सा करणे, विचार करणे आणि मात करणे गरजेचे असते. या अर्थाने व्यक्तिगत पातळीवर जन्माधिष्ठितेवर मात करता येऊ शकते.

 

     पुण्यात प्रियांका सातपुते या युवा फोटोग्राफर मुलीच्या फोटोंचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित करण्यात आले, ते पाहताना, फोटो, फोटोग्राफर, जाती-वर्ग, सामाजिक आशय, जाणीव-नेणीवा अशा विचारांनी मनात काहूर उठले. कारण याच ठिकाणी अनेक चित्र, फोटो प्रदर्शने पाहिली होती. काही खूप भावली, आवडली होती. पण हे प्रदर्शन पाहताना ज्या पद्धतीच्या विचारांनी काहूर माजवले तसे आधी फारसे झाले नव्हते. प्रियांका सातपुते आणि तिचा जीवनसाथी बालाजी वाघमारे दोघांशी खूप गप्पा झाल्या. फोटोबद्दल चर्चा झाली. या प्रदर्शनाची निर्मिती प्रक्रियाही महत्त्वाची होती. अप्रतिम फोटो काढले प्रियांकाने. तिचे वडील रवींद्र सातपुते अहमदनगरमध्ये कला शिक्षक, हे सत्यशोधक-पुरोगामी विचारांचे. घरात मिळालेल्या मोकळ्या वातावरणातून प्रियांका वाढलेली. मुलीच्या हातात कॅमेरा काय देतात? शोभतो का मुलीच्या जातीला? असे अनाहूत सल्ले देणार्या मित्रपरिवाराकडे दुर्लक्ष करत तिचा छंद जोपासला गेला होता. पुढे याच क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेला जीवनसाथी तिला मिळाला. 4-5 वर्ष जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या कॅमेर्यासोबत काढलेले फोटो प्रदर्शित करण्याचं या दाम्पत्यानं ठरवल. बालगंधर्व कला दालनात प्रदर्शनाची आदली रात्र. प्रियांकाचे सासरे, सासू, आई, वडील सारे हजर. फोटो फ्रेम बनवण्याच काम सुरू होत. सासरेबुवा सुनेच्या फोटोंसाठी फ्रेम बनवायला लगबगीनं पुढे आले. सुती साड्यांनी फ्रेम झरझर तयार करू लागले. फ्रेमला अचूक खिळे ठोकू लागले. पूर्वी फक्त चपलांना खिळे ठोकण्याचेच काम जाती समाजाने लादलेले. चपलांना खिळे ठोकणारे हात ‘मी’ चा शोध घेणारे फोटो काढणार्या सुनेच्या फोटो प्रदर्शनासाठी आनंदाने सरसर चालत होते. पुरुषी अहंगंड आणि नवरेशाहीवर मात करायला निघालेला नवरा बालाजी लगबगीने फोटोंची मांडणी वैशिष्टपूर्ण कशी होईल हे पाहत होता. दारावर येणारा कलईवाला, तांड्यासोबत आलेल्या कष्टकरी स्त्रिया, त्यांची निरागस पोर, लेथ मशीनवर काम करणारे हाथ, गरिबांचं घर आणि मी घराबाहेर पडल्यावर दिसलेलं भिंतीबाहेरचे जग असे विविध विषय प्रियांका सातपुतेने आपल्या कॅमेरात टिपले आहेत.

     कलादालनात चित्रप्रदर्शनाची सुरुवात गौतम बुद्धांच्या पुतळ्यापासून होते. काशाय(गेरुआ) साडीच्या सजावटीनं बुद्ध भेट आनंददायी होते. पहिल्या भिंतीवर आजवर न मांडल्या गेलेल्या भारतीय स्त्रिया भेटतात. 5 ते 80 वय वर्ष असणार्या या देशी स्त्रिया, त्यांचे अप्रतिम असे सौंदर्य-त्यांचे दिसणं, त्याचं असणं, त्यांचे कष्टाने राबलेले चेहरे-करारी चेहरे, निरागस चेहरे, त्यांचे दात-मशेरीनं काळेकुट्ट झालेले, मोठे-पांढरेशुभ्र! एखादा पडलेला, त्यांचं जगणे सहजच अधोरेखित होतं आणि भावतंही! प्रियांकासाठी त्या मॉडेल ठरल्या आहेत हे महत्त्वाच आहे. दुसऱ्या भिंतीवरील फोटो पहिल्यावर चारभिंतीतून बाहेर पडलेली एक सामर्थ्यवान बाई भिंतीबाहेरचं जग कसं बघते? हे प्रभावीपणे पुढे येत होतं. त्यात, भिंती पलीकडे डोकावणं आहे. भिंतीचा अडसर पार करत दिसणारा प्रकाश आहे. हे असे असले तरी, हे असे असणार नाही या सुरेश भटांच्या ओळी हे पाहताना ओठी आल्याशिवाय राहिल्या नाहीत. भविष्यकाळ सुंदर करण्याचा, नवी पहाट येणार आहे याचा आशावाद फोटोत सामावला गेला आहे. एक भिंत काळ्या आणि पांढर्या रंगांच्या फोटोंनी व्यापलेली होती. त्यात आभाळाला गवसणी घालणार्या नजरा लक्ष्यवेधी आहेत. ती माणसं म्हणजे जमिनीवर पाय असणारी माणसं आहेत. काळ्याकुट्ट चौकटीत प्रकाशाच्या झरोक्यात आपलं स्वतंत्र अस्तित्व दिमाखात मिरवणारी बदली ‘ती’चं प्रतीक वाटत राहते. एका भिंतीवर सौंदर्य प्रसाधन आणि नटत असलेल्या स्त्रिया भेटतात. आरसा या माध्यमाचा उत्तम वापर यात झाला आहे. जातिवर्गानुसार उपलब्ध असणारी सौंदर्य प्रसाधन चपखलपणे फोटोतून साकारली आहेत. कनिष्ठ जातिवर्गातील स्त्रियांचा मेकअप कीट काजळ, कुंकू, चेहर्याला पावडर इतकाच! मेकअप कोण कशासाठी, तर कोणाला कशासाठी करावा लागतो हाही विचार पुढे आला आहे. भटक्या मुलींचा फोटो हृदयात घर करतो. तर आरशाला घुंगरं अडकून चेहरा रंगवावा लागणारी भगिनी काळजाचा वेध घेते. स्वतःऐवजी देवीच्या मूर्तीला रंगवून पोटाची खळगी भरू पाहणारी मैत्रिण मनात घर करून जाते. कष्टकरी भिंत आगळीवेगळी, महत्त्वाची आहे. त्या भिंतीवर एकूण 14-15 फोटो आहेत. कष्टाची कामे करतानाचे स्त्री-पुरुष त्यात भेटतात. लेथ मशीनवर ताकद लाऊन काम करणारे हात आहेत, माशांंचा भार डोक्यावर घेऊन जाणारी कोळी स्त्री आहे, शेतात मातीत काम करणारी शेतकरी स्त्रीचे मातीतील पाय आहेत, कुलूप विकणारी व्यक्ती आहे, इरलं विणण्यात मग्न व्यक्ती आहे.

     या सर्वांसोबत एक फोटो आहे तो चुलीचा. तवा, फुकणी, पातेलं, पितळी त्यात दिसतात. अपार कष्ट या थीममध्ये स्वयंपाकाचे काम प्रियांकाने समाविष्ट केले हा फार महत्त्वाचा विचार आहे. कारण स्त्रियांच्या गृहश्रम हे उत्पादक श्रम असतात हा सिद्धांत मानायला आजही समाज, राज्यसंस्था, धर्म, रूढी-परंपरा तयार नाहीत. स्त्रियांनी मासे किंवा अन्य काही वस्तू इ. बाजारात विकणे हे श्रम मानले जातात, लेथ मशीनवर काम करणे हे श्रम मानले जातात, पण त्याच स्त्रियांनी केलेल्या घरकामाची मोजदाद श्रमामध्ये केली जात नाही. 19व्या शतकात म. फुले यांनी ‘कुळबीण अखंड’ लिहिला आहे. त्यात स्त्रियांच्या गृहश्रमाची दखल घेतली होती. नंतरच्या काळात स्त्रीवाद्यांनी हा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अद्यापही स्त्रियांच्या गृहश्रमाला गृहीतच धरण्यात आले आहे. प्रियांकाने काढलेले फोटो सामाजिक भान असणारे आणि देणारे असे आहेत. जीवनाकडे बघण्याचा एक आशावाद त्यातून जाणवतो. फुटक्या आरशात चेहरा बघू नये असा पारंपरिक समज आहे. नशीब फुटक निघत असे सांगितले जाते. पण या जातिग्रस्त समाजाने ज्याचं आयुष्यच फुटकं बनवल त्यांना काय या फुटक्या आरशाचे भय? फुटका संसार सांभाळणार्या या कनिष्ट जातीतील स्त्रीला प्राधान्य देत फुटक्या आरशात बघत कुंकू हसत मुखानं लावणारी स्त्री क्लिक करणं निराळच आहे. स्त्री तीचे फोटो मास्टरपीस आहे. ती इतकी त्या ओझ्यान वाकलेली आहे की, तिचा चेहराच हरवला आहे, तो दिसत नाही, दिसतात ते फक्त भारानं वाकलेले तिचे पाय! आजवर गृहीत धरलेल्या माणसांना, श्रमाना, जातींना आपले नायिका-नायक म्हणून पुढे आणणे फारच महत्त्वाचे आहे. हे सत्यशोधकी जाणीव नेणीवामधून साकारलेल एक फोटो प्रदर्शन एका प्रवासाची सुरुवात आहे. निर्हुतीच्या लेकीचा हा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचा आहे.

By |2018-07-16T13:31:12+00:00जुलै 16th, 2018|Gender|0 Comments