शेतकर्‍यांवरील अन्याय संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा –  अ‍ॅड. आंबेडकर

औरंगाबाद : आजपर्यंत शेतकर्‍यांवर अन्यायच झालायं. शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव नाहीये, शेतकरी दुष्काळाने मरतोय आणि सत्ताधारी भाजपाचे लोक शेतकर्‍यांची थट्टा करताय. शेतकर्‍यांवरील अन्याय संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

70 वर्षांनंतर स्वत:चा अधिकार वापरण्यासाठी आपण सत्तेत येणार आहोत, ही भावना निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळायला सुरुवात झाली. आता त्यातील छोटा इतर मागासवर्गीय घटक निवडणुकीच्या प्रक्रियेतून अलगद बाहेर ठेवला जात आहे. त्याला परत आणण्याची खूणगाठ मनाशी बांधून काम करावे लागेल, अन्याय संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे रहा. सुरू केलेल्या या कामामुळे अनेकांना धडकी भरली असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. बदलाची ही सुरुवात मतदान होईपर्यंत अशीच कायम राहावी, असे म्हणत देशाची परिस्थिती भयावह असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर म्हणाले, ‘प्रधानमंत्री स्वच्छ असल्याचा दावा भाजप नेहमी करते. प्रधानमंत्री स्वत: खात नाही. पण, दुसर्‍याला खायला लावून हिस्सा मागतात. शेतकर्‍याप्रमाणे व्यापार्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. शासनाने यावर लवकर भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आमची ताकद दाखवू असेही त्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याची आठवण करून देत त्यांच्यावर टीका केली. बहुजन वंचित आघाडीला सत्ता मिळाल्यास राजेशाही संपलेली असेल. त्यांच्या परवान्याचेही नूतनीकरण  होणार नाही, ते सत्तेत राहणारच नाही. दानवे शेतकर्‍यांबाबत वाईट बोलत आहेत. ‘इथे राजेशाही संपली असून तुम्ही राजासारखे बोलाल, तर जेलमध्ये टाकू’ असे आंबेडकर म्हणाले. नक्षलवाद्यांवर कारवाई होते आणि सनातन्यांवर कारवाई होत नाही. यातून सरकारची भेदभावाची वागणूक दिसते, असा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. औरंगाबाद येथे आयोजित शेतकरी महामेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदउद्दीन औवेसी, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार अ‍ॅड. विजय मोरे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अमित भुईगळ, मातंग लाल सेनेचे गणपत भिसे, साळी समाज संघटनेचे अरुण घोडके, एसपीसी संघर्ष समितीचे महेश निनाळे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे रवीकांत राठोड, मराठवाडा वारकरी मंडळाचे ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ, विश्‍वकर्मा सुतार समाजाचे मोहन गोरुडे, बुलढाणा येथील पहिल्या मुस्लीम नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सच्चार, वडार फोरमचे अध्यक्ष टी.एस.चव्हाण, रेखा ठाकूर, अकोला जि.प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे आदींची भाषणे यावेळेस झाली. एमआयएमचा बहुजन वंचित आघाडीत समावेश झाल्यामुळे नव्या समीकरणाची नांदी ठरेल अशी अलोट गर्दी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर जमली होती.

शेतकरी महाअधिवेशनाला संबोधित करतांना बॅरिस्टर असदउद्दीन औवेसी… (फोटो- चेतन गाडे)

प्रकाश आंबेडकर तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडायचे असतील, तर प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविले पाहिजे. त्यासाठी कंबर कसून कामाला लागूया, असे आवाहन ओवैसी यांनी उपस्थितांना केले. 1952च्या निवडणुकीतही डॉ. आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी हीच मंडळी कार्यरत होती. भारतीय संविधान हे रा.स्व.संघ किंवा नेहरू, गांधी परिवाराने दिलेले नाही किंवा जानवेधार्‍यांनीही दिले नाही. त्यामुळे ती देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी काम करणार्‍या बहुजन वंचित आघाडीला आमचा पाठिंबा असेल, असेही ओवैसी म्हणाले.  1946 साली डॉ. आंबेडकरांनी घटना समितीला पत्र लिहिले होते आणि त्यात म्हटले होते, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असावा. तसे मंत्रालय निर्माण करण्यासाठी 2005 हे साल उजाडावे लागले. डॉ. आंबेडकरांचे द्रष्टेपण हे असे दिसून येते. त्यांनीच के. एम. मुन्शी यांना अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत खडसावले होते. मोदी सरकार आणि अनेक वर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांवर ओवैसी यांनी टिकास्त्र सोडले. ‘70 वर्षांपासून सत्तेत असलेल्या जुलमी नेत्यांचे वर्चस्व संपविण्याची वेळ आली आहे. पूर्वी हेटाळणीची वागणूक सहन केलेल्या दलितांना अजूनही सत्तेत योग्य स्थान नाही. देशाला मोदी, पवार, नेहरू, गांधी यांनी संविधान दिले नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. देशाला संविधानाची गरज नसल्याचे सांगणार्‍या आरएसएस, भाजपला अचानक संविधानाबद्दल प्रेम उफाळून आले आहे. एकीकडे मोदी आणि दुसरीकडे जानवेधारी राहुल गांधी अशी स्थिती आहे. तुम्ही सावध राहून मतदान करा’ असे आवाहनही त्यांनी केले. औरंगाबादला संविधान यात्रा काढणारे साहेब बुडणार्‍या पुतण्याला वाचवण्यासाठी यात्रा काढत आहेत. जे स्वत: बुडत आहेत ते काय संविधान वाचवणार असा सवाल करत ओवैसी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील बहुजन वंचित जाती सत्ताधारी पक्षांच्या अत्याचाराच्या बळी आहेत. बहुजनांच्या बळावर अनेक पक्षांनी सत्ता गाजवली. पण, जनतेला न्याय दिला नाही. आता दलित, अल्पसंख्याक, ओबीसी समाजाने एकत्रितपणे महाराष्ट्रात परिवर्तन घडवावे, अशी हाक एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 2019मध्ये परिवर्तन घडवताना भाजप सरकार उलथवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

जनतेला अभिवादन करतांना मान्यवर…

पाच खासदार निवडून येतील – असुदुद्दीन ओवैसी

मोदी यांचे संसदेत 280 खासदार आहेत. माझ्यासोबत प्रकाश आंबेडकर असते, तर संसदेत मोदी यांना त्रस्त करून सोडले असते, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या लोकसभा निवडणुकीत पाच खासदार निवडून आले, तर तुमचे प्रश्‍न मांडले जातील. सध्या बहुजन-दलितांचे नेतृत्व करणारे चमचे संसदेत आहेत. हे स्वाभिमान नसलेले नेतृत्व तुमचे काय प्रश्‍न मांडणार, असा सवाल ओवैसी यांनी केला.

By |2018-10-15T09:24:33+00:00ऑक्टोबर 15th, 2018|Our News, Featured|0 Comments