वंदे मातरमची सक्ती करता येणार नाही !

  – अॅड. प्रकाश आंबेडकर

    गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मी असे म्हटले की, वंदे मातरमच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहील. ’जन गण मन’ हे संविधान मान्य राष्ट्रगीत असताना दुसरे कोणतेही गीत म्हणण्याची सक्ती भारतीय नागरिकांवर करता येणार नाही हे विधान मी केले  होते आणि त्या विधानावर मी आजही ठाम आहे. आरएसएस आणि त्यांच्या पिलावळ संघटना सनातनी वैदिक हिंदुत्व इथल्या अहिंसा, शांती आणि समता हवी असणार्‍या बहुजनांच्या माथी मारण्याचे जे राजकारण चालू आहे त्याविरुद्ध संघर्षाची ही भूमिका आहे.

खून से तिलक करो, और गोलियो से आरती,

पुकारती, पुकारती माँ भारती !

हिंदुस्थान मै रेहना होंगा,

तो वंदे मातरम् कहेना होंगा !

राजतिलक की करो तयारी,

आ रहे है भगवाधारी !

चप्पा-चप्पा गुंजेंगा राम के नारे से

पुकारती, पुकारती माँ भारती !

हिंदुस्थान में रेहना होंगा,

तो वंदे मातरम कहेना होंगा !

     या कवितेच्या आणि ह्याच प्रकारच्या वेगवेगळ्या कवितेच्या ओळी देशात अनेक ठिकाणी वैदिक सनातनी हिंदुत्व मानणार्‍या संघटनांकडून जाहिरपणे गायल्या जातात. आरएसएसप्रणीत सर्व कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेना वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून याचे प्रदर्शन करतात. कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक  वेबसाईट्सवर ही कविता ’हिंदू अ‍ॅन्थेम‘ या मथळ्याखाली आहे. या गाण्याचे व्हिडीओ अत्यंत आक्रमकपणे लहान मुलांना आपण  हिंसा आणि द्वेष पसरविण्यासाठी वापरत आहोत याचा कोणताही विधीनिषेद न बाळगता तयार केलेले  आहेत.

‘हिंदुस्थान में रहेना होंगा, तो वंदे मातरम कहेना होंगा‘ असे म्हणत वंदे मातरम म्हणा अन्यथा या देशातून चालते व्हा, असा प्रत्यक्ष संदेश या संघटना जाहिरपणे देशातील जनतेला देत आहेत. देशामध्ये जन गण मन हे राष्ट्रगीत असताना त्याला समांतर गीत का ? आणि त्याची सक्ती का? हा सवाल आम्ही करतोय. संविधानाबाहेरील कोणतेही गीत म्हणणे हे ऐच्छिक आहे  आणि म्हणूनच वंदे मातरम म्हणणे हे ऐच्छिक आहे. यासाठी कुणीही बळजबरी करु शकत नाही.  वैदिक सनातनी हिंदुत्व मानणार्‍या लोकांकडून देशात मनुवाद आणण्यासाठी अल्पसंख्यांकाबद्दल भीतीचे वातावरण पसरवण्याचे काम पूर्वीपासूनच चालू आहे.  भाजप सत्तेत आला तोच मुसलमानांबद्दल हिंदूमध्ये भीती घालून आले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आणि मुसलमान द्वेष हिंदुत्ववाद्यांचा जुना अजेंडा आहे.  म्हणूनच  वंदे मातरमचा इतिहाससुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे. बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1876 साली हे गीत लिहिले, पण ते काही वर्षांनी प्रसिद्ध झाले ते त्यांच्या ‘आनंदमठ‘ या कादंबरीमध्येे. ही कादंबरी गाजली ती सुशिक्षित बंगाली ब्राह्मण वर्तुळात. आनंदमठ या  कादंबरीत मुसलमान द्वेषाची प्रेरणा होती. स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय पुनरुत्थानवादी हिंदू परंपरेच्या कालखंडात आनंदमठ ही कादंबरी आली होती.  त्यानंतरच्या  स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात, संविधान निर्मितीच्या काळात, ’वंदे मातरम’ला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा आणि आताही वंदे मातरम वादग्रस्त राहिले आहे.

 

 

      भारतीय हिंदू देवतांची स्तुती असलेले गीत राष्ट्रगीत म्हणून न स्वीकारता रवींद्रनाथ टागोरांचे ‘जन गण मन‘ हे  भारताच्या बहुविध संस्कृतीचा आदर करणारे गीत संविधान समितीने स्वीकारले. तेव्हा आणि नंतरही वंदे मातरमबद्दल वाद निर्माण केला गेला.  हे वाद निर्माण करणारे कोण आहेत?  ज्यांना भारतीय राष्ट्रीयत्वाऐवजी  हिंदू राष्ट्रीयत्व हवे आहे? ज्यांना संविधानाऐवजी मनुस्मृती आणायची आहे. ज्यांच्यादृष्टीने स्वातंत्र्य दिन  हा ‘शोक दिन‘ होता कारण, त्यांना हवे असलेले हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा रस्ता सेक्युलर भारताने बंद केला होता आणि संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची मूल्ये मानणार्‍या राष्ट्राची निर्मिती केली होती. वंदे मातरमच्याऐवजी जन गण मन हे रवींद्र टागोर यांचे गीत स्वीकारले गेले म्हणून रवींद्रनाथ टागोरांबद्दल आणि अधिकृत राष्ट्रगीताबद्दल राजनिष्ठ कवीने राजप्रशस्तीचे गीत आहे हा खोटा आणि हीन प्रचार आरएसएसप्रणित संघटनांनी अनेक वर्ष चालू ठेवला आहे.

      संविधान सभेमध्ये राष्ट्रगीत कुठले आणि काय असावे या संदर्भात चर्चा होत असताना जन गण मनला संविधान सभेने देशाचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. संविधानातील कलम 51 (ए)मध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा प्रत्येक भारतीयांने  आदर केला पाहिजे, असे स्पष्ट नमूद केले असताना वंदे मातरम हेही राष्ट्रगीत म्हणून हवे. व ते तुम्ही म्हणाच या हट्टाला आमचा विरोध आहे आणि तो पुढेही राहील. काय म्हणावे आणि काय म्हणू नये हा निर्णय लोकांच्या पसंतीवर सोडायला हवा. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपण लोकशाही देशात राहतो. त्यामुळे संविधानानुसारच देशातील प्रत्येकाची सगळी कृती झाली पाहिजे. आणि संविधानाने ज्या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे ते गीत आणि जो ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला आहे तो ध्वज याचा सन्मान आणि आदर  प्रत्येक नागरिकाने, नोंदणी झालेल्या आणि नोंदणी नसलेल्या संघटनांनी केलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) सुरुवातीपासूनच राष्ट्रीय ध्वज आपल्या मुख्यालयावर लावला नाही. आणि हाच सगळ्यात मोठा राष्ट्रद्रोह आहे.  2014 साली भाजपा सत्तेत आल्यावर  स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आरएसएसच्या मुख्यालयावर 15 ऑगस्टला राष्ट्रध्वज  फडकला होता. पण या राष्ट्रद्रोहाबद्दल बोलायची  हिंमत  इथले प्रस्थापित पक्ष किंवा वर्तमानपत्रे  दाखवत नाहीत.  नोंदणीसुद्धा न केलेल्या संघटनेकडे  आधुनिक शस्त्रास्त्रे कुठून येतात हा सवाल इथले पोलीस  किंवा अनेक वर्ष सत्तेत असलेले मोठे पक्ष उपस्थित करत नाहीत.

       वंदे मातरमला राष्ट्र गीताचा दर्जा देता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2017 ला  दिला आहे. एकदा राष्ट्रगीत ठरल्यावर उर्वरित काय म्हणावे आणि काय म्हणू नये हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. वंदे मातरम हेही राष्ट्रगीत म्हणून हवे व ते सर्वांनी म्हणले पाहिजे या हट्टाला आमचा विरोध आहे आणि तो पुढेही राहील. आणि हा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह नाही, तर संविधान बाह्य  शक्तींचा अंमल चालवून घेतला जाणार नाही हे ही आम्ही सांगत आहोत. संविधानाने निश्‍चित केलेले राष्ट्रगीत हिंदुत्ववाद्यांना का मान्य नाही? आरएसएसला त्यांच्या मुख्यालयावर  राष्ट्रध्वज फडकवायला  स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष का  लागली?  पर्यायी गीताचा आग्रह का? जन गण मन अधिकृत राष्ट्रगीत म्हटले, तर भारत विरोधी (अँटी इंडियन) किंवा राष्ट्रद्रोही आणि वंदे मातरम म्हटले तर भारतीय (इंडियन) किंवा राष्ट्रभक्त हे कोणी सांगितले? ही सर्टिफिकेटे वाटणारे आरएसएस आणि त्यांच्या कडव्या सनातनी संस्था कोण आहेत?  असा आमचा थेट सवाल आहे. बंदुकीच्या गोळ्यांनी आरती करा  सांगणारी कविता हिंदू अँथम होते,  हेच   आरएसएस आणि त्यांच्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे चारित्र्य आणि हेतू स्पष्ट करते.  यात केवळ धर्मांधता नाही, तर जाणीवपूर्वक संविधान नाकारण्याचा भाग आहे आणि संविधान बाह्य शक्तींचे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न आहे.   डॉ नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातन संस्था  असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. दाभोलकरांनी तथाकथित ज्योतिषविद्येला आव्हान देत, त्यातील आर्थिक हितसंबंध धोक्यात आणले होते. गौरी लंकेश या  बसवेश्‍वरांचे तत्त्वज्ञान आणि लिंगायत धर्म हा हिंदुत्वाचा भाग नाही हे मांडत होत्या. स्वातंत्र्य दिन हा दुर्दैवी दिवस मानणार्‍यांचे अविवेकी वारसच आज  ‘हिंदुस्थान मै रेहना होंगा, तो वंदे मातरम कहेना होंगा‘ची धमकी देत आहेत.   गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मोहमंद अखलाकची हत्या, उना प्रकरण, डॉ.नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे  आणि गौरी लंकेश यांची हत्या आणि भीमा कोरेगाव येथे केलेला संघटित हल्ला या सर्वच घटना विषमता जोपासणार्‍या मनुवादी वैदिक हिंदुत्वाच्या विचारसरणीचे व्यावहारिक रूप आहेत.

      वंदे मातरमची सक्ती करणारे आणि परंपरेच्या नावाखाली  एके 47 आणि मशीनगन सारख्या शस्त्रांची पूजा करणार्‍यांची  मानसिकता ही हिंसाचाराची मानसिकता आहे, हिंसेच्या आधारे वैदिक मनुवादी व्यवस्था टिकविणार्‍यांची आहे. इतर समूहांच्या विद्वेषावर सत्तेत आलेल्यांची मानसिकता आहे. पण ही मानसिकता इथल्या  सहिष्णुता, शांतता आणि समता हवी असणार्‍या बहुजनांची मानसिकता नाही. संविधान मानणार्‍या  भारतीय नागरिकांची नाही. म्हणूनच वंदे मातरमच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहील. हाच विवेकवादी राजकीय विचार आणि व्यवहार आहे. खंत इतकीच की, स्वत:ला  पुरोगामी आणि भाजपाविरोधक म्हणवणारे विचारवंत किंवा वृत्तपत्रे जेव्हा  ही  भूमिका घेत नाहीत, तेव्हा तो भाबडेपणा आहे का सत्तेपुढे लाचारी आहे असा प्रश्‍न पडतो. राष्ट्रगीताचा सन्मान सर्व भारतीय करतात. जन गण मन हेच  संविधान मान्य राष्ट्रगीत आहे हे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेले आहे. संविधानाचा आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून जन गण मन हेच आम्हा भारतीयांचे राष्ट्रगीत आहे, इतकेच  आम्ही सांगत आहोत.

By |2018-11-02T12:01:10+00:00नोव्हेंबर 2nd, 2018|Editorial|0 Comments