वंचित बहुजनांनो, सत्ताधारी व्हा!

– शांताराम पंदेरे 

      काही महिन्यांपूर्वी विठ्ठल-रखुमाईच्या साक्षीने पंढरपुरात मोठ्या संख्येने धनगर समाजाचा मेळावा जमला होता. प्रथमच आपल्या समाजाच्या प्रश्‍नांबरोबरच जमलेल्या समूहाने सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायापासून वंचित-बहुजनांबरोबरच एकत्र येवून आपल्या हातात सत्ता घ्यायचे आवाहन केले. कोणत्याही पक्षाकडे भिक न मागता इतर वंचित समूहांच्या बरोबर सत्ता संपादन करून आपले प्रश्‍न आपणच सोडविण्याचा निर्धार केला. या सामाजिक प्रक्रियेची  कुणी फारशी दखल घेतलीच नाही.  पण वंचित-बहुजनातील कार्यकर्ते-तरुण सोशल मीडियातून सारखे बोलत-लिहीत राहिले. या मेळाव्याचे एक महत्त्व किंवा वैशिष्टय आहे. ही केवळ  सत्ता संपादनासाठी पक्षांची युती नव्हती, तर आश्‍वासनांना कंटाळलेले समाज समूह आता आमच्या हक्कांसाठी आणि विकासाच्या संधींसाठी इतरांवर अवलंबून न राहता आमचे प्रश्‍न सहमतीने सोडवू यासाठी एकत्र येण्याच्या प्रक्रियेची सुरुवात  होती. या नंतर सोलापूरला विराट वंचित बहुजनांचा मेळावा झाला आणि त्यानंतर   औरंगाबादला विराट शेतकरी अधिवेशन झाले. या सभेला खा.असदउद्दीन औवेसी, माजी आमदार. लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार. हरिदास भदे, रेखा ठाकूर,  एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अमित भुईगळ, यांच्यासह मातंग लाल सेनेचे गणपत भिसे, साळी समाज संघटनेचे अरुण घोडके, एसपीसी संघर्ष समितीचे महेश निनाळे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे रवीकांत राठोड, मराठवाडा वारकरी मंडळाचे ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ, विश्‍वकर्मा सुतार समाजाचे मोहन गोरुडे, बुलढाणा  शहराच्या पहिल्या मुस्लीम नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सच्चार, वडार फोरमचे अध्यक्ष टी.एस.चव्हाण आणि अकोला जि.प. अध्यक्षा संध्याताई वाघोडे  यांनी आपली भूमिका मांडली. हे  विविध समाजाचे वक्ते, हे केवळ व्यक्ती म्हणून उपस्थित नव्हत,े तर ते त्यांच्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी होते, पदाधिकारी होते आणि म्हणूनच त्यांची उपस्थिती ही एका राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी होती.

      सोलापूर येथील प्रचंड सभेनंतर, एआयएमआयएम बरोबर युती झाल्यामुळे औरंगाबादच्या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यात मुस्लीम समुदायाचा काय प्रतिसाद आहे याचे असे कुतूहल होते तसेच, एआयएमआयएम बरोबरच्या युतीमुळे छोटे ओबीसी समूह किती प्रतिसाद देतात याबद्दल ही कुतूहल होते. गर्दीचे सर्वांचे अंदाज तोडल्याने दुपारपासून बर्‍याच मीडियाने याची दखल घ्यायला सुरुवात केली. मोठ्या संख्येने छोटा ओबीसी, बौध्द, मुस्लीम समाजातील तरुण तसेच स्त्रिया प्रचंड संख्येने उपस्थितीत होत्या. हे सर्व लोक  महाराष्ट्रातील विविध भागातून आले होते. ते वर्गणी काढून आले, कमालीच्या शांततेने व शिस्तीने आले आणि सभा पार पडल्यानंतर तशाच शिस्तीने परतल्यामुळे सर्वांचे ‘गोंधळा’ बद्दलचे आडाखेही चुकले. आता तरी या समूहांविषयीचे गैरसमज दूर व्हायला सुरुवात होतील ही अपेक्षा आहे.

       या सभेत बॅरीस्टर खा. औवेसींनी सर्व भाषण फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटना आणि आजवर फसविला गेलेला मुस्लीम समाज, छोटा ओबीसी-वंचित बहुजन आणि या सर्व समूहांच्या हितासाठी संविधान टिकविण्याचे महत्त्व याच मुद्दयांभोवतीच केले. त्याचबरोबर औवेसींनी धनगर समाजाप्रमाणेच, मुस्लीम आणि इतर ओबीसी समूहांसह एकत्र येऊन घटनात्मक मार्गाने सत्ता ताब्यात घेण्यासाठी तमाम मुस्लीम समाजाला  बहुजन-वंचित आघाडीच्या मागे उभे राहण्याचे  आवाहनही केले. आता सर्वच छोटे आणि वंचित समूह केवळ हक्कांबद्दल जागृत झाले आहेत असे नाही, तर आता त्यांना आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी इतरांच्या ‘मेहेरबानीची’ वाट बघण्यापेक्षा आपणच आपले प्रश्‍न सोडवले पाहिजेत याची जाणीव झाली आहे आणि त्यासाठी इतर वंचित समूहांबरोबर चर्चा आणि सहकार्य करायला हवी याची जाणीव होत आहे. आता मुस्लीम, बहुजनविरोधी मूठभर अतिरेकी-मनुवादी हिंदूंची खरी पंचाईत झाली आहे ती यामुळेच. त्यातच पेट्रोल-डिझलेचे वाढत जाणारे भाव, सिमेवरील भारतीय सैनिकांची चाललेली कत्तल, अफाट भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या-शेतकरी आंदोलन, आरक्षणाचा प्रश्‍न, समूहांकडून भटके-विमुक्तांची होणारी कत्तल, स्त्रिया आणि मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग, शिक्षणाची वाढती किंमत आणि असे अनेक प्रश्‍न नियंत्रित करण्यात आलेले संपूर्ण अपयश आता सर्वांच जाणवायला लागले आहे.  लोकांचे मोदी प्रेम उतरायला लागले आहे. चार राज्यांच्या आगामी विधानसभांमध्ये सत्ताधार्‍यांना येणारे अपयश अनेक माध्यमांनी सांगितल्यामुळे सत्ताधारी अधिकच हैराण झाले आहेत. त्यामुळेच या विराट सभेनंतर संघपरिवाराने ओवेसी, मुस्लीम समाजाविषयी खोटा प्रचार करायला सुरुवात केली आहे. धनगर-छोटा ओबीसी-शिवाजी महाराजांचा कष्टकरी-मराठा आपल्या हातातून निसटत आहे म्हणून ही ओरड सुरु आहे. त्यासाठी त्यांनी महालातील मोगलाई मराठ्यांना बोलण्यासाठी पुढे केले आहे.  वास्तविक काँग्रेस असो व भाजपा, दोन्ही पक्षांनी  ओबीसी, भटके-विमुक्त जाती-जमाती व डोंगर-दर्‍यातील आदिवासींना आजवर सत्तेसाठी केवळ आपल्यामागे फरफटत नेले. त्यांचे कोणतेच प्रश्‍न विधानसभा वा लोकसभेत मांडले नाहीत.  किंबहुना त्यांचे प्रश्‍न कुजवत ठेवण्याचेच राजकारण केले. राजकारणात हे समूह ’बिन चेहर्‍यांंचे’ राहिले. याच बिन चेहर्‍याच्या समाजांना सोलापूर व औरंगाबादच्या सभांमुळे नवा आत्मविश्‍वास वाटू लागला आहे. मुस्लीम द्वेष, वंचित बहुजन समाजातील विविध समुहांमध्येे आरक्षणावरून संघर्ष उभा करणे याला पूर्वी हे समूह बळी पडले. पण आता या समूहातील युवा वर्गाला आपण फसवले गेल्याची जाणीव झाली आहे. हे युवक शिक्षित आहेत, त्यांना सामाजिक आणि राजकीय वास्तव जाणवते आहे आणि त्यांना न्यूनगंड नाही. हेच युवा आज वंचित बहुजन आघाडीचा पाया आहेत. त्यांना बाबासाहेबांनी संविधानामार्फत सर्वसामान्य वंचित बहुजनांना नक्की काय अधिकार, संरक्षण आणि सत्तेत येण्याची संधी दिली आहे याची जाणीव झाली आहे.

      कोणत्याही समाजाच्या द्वेषाचे राजकारण आपले प्रश्‍न सोडवू शकत नाही. त्यात आपण फक्त वापरले जातो याचे भान छोट्या ओबीसी समूहांना हळूहळू येत आहे. विकासाची संधी, संधींची समानता आणि ही संधी नाकारल्या गेलेल्या समूहांना (स्त्रियांसह) सामाजिक न्याय हाच मार्ग आहे आणि त्यासाठी संविधान वाचविणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच इतर वंचित समूहांबरोबर  जोडून घेण्याची गरजही जाणवते आहे. आता हे भान राजकीय इच्छाशक्तीत आणि राजकीय निर्णयात परावर्तीत करायचे असेल, तर या समाजाचे नेतृत्व करू शकणार्‍या स्त्री आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आपली प्रेरणादायी प्रतीके पुढे आणली पाहिजेत. आपल्या समाजाचे प्रश्‍न काय आणि काय हवे आहे याची चर्चा केली पाहिजे आणि हे साध्य करण्यासठी इतर वंचित समूहांबरोबर सत्ता मिळविण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी समूहाचे मेळावे, आपापली नियतकालिके यातून कोणत्याच समूहाचा द्वेष करून प्रश्‍न सुटत नाहीत याची जाणीव करून देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ मुस्लीम समूहांमुळे माझा किंवा माझ्या समाजाचा नक्की कुठे तोटा झाला? माझ्यावर नक्की काय अन्याय झाला या प्रश्‍नांची प्रामाणिक चर्चा झाली तरच आता निर्माण झालेले विद्वेषाचे वातावरण निवळू शकेल आणि ते निवळणे हेच सर्व बहुजन समूहांच्या हिताचे आहे. आता सर्व वंचित समूहांनी सोशल मीडियातून, आपापल्या सामायिक संघटना आणि कार्यक्रमातून, गावा गावात, वस्ती-वस्तीत जावून बैठका घ्याव्यात. वंचित समूहांच्या संघटीत सत्ता संपादनाची चर्चा चालू केली पाहिजे. संधिसाधू राजकारणापासून सावध राहणे आणि त्याचबरोबर आपल्या हिताचे राजकारण समजावून सांगणे हे आता करावे लागणार आहे. आपला संघर्ष थोड्या बहुत आपल्यासारख्याच परिस्थितील समूहांशी नाही, तर आपल्या वंचित ठेवणार्‍या मनुवादी व्यवस्थेशी आणि मनुवादी व्यवस्था ज्या समूहांच्या   फायद्याची आहे त्यांच्याशी आहे हे समजून घेण्याची  आणि समजाऊन सांगण्याची गरज आहे. ’आम्ही आता आमचा स्वतंत्र विचार करणार आणि सत्ता ताब्यात घेवून आम्ही आमचे प्रश्‍न सोडविणार’ हा नारा दिला पाहिजे. ’तुमचे डोके आणि आमचे केवळ हात’ असा आंधळा व्यवहार यापुढे होणारच नाही याच निर्धाराने पुढे जाऊ या. संसदीय लोकशाहीत निवडणुकीच्या मार्गाने सत्येवर येण्यासाठी आवश्यक शक्ती  आपल्याकडे आहे, पण ती शक्ती वंचित समूह संघटित झाले, तरच निर्माण होऊ शकते आणि एकदा झाल्यावर राजकीय सत्तांतर घडवू  शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. यासाठी कोणतीही हिंसा नको. संघ परिवार फक्त घटना अणि तिचा आधार असलेले वंचित-बहुजन शक्ती यालाच घाबरतो. त्यामुळे आपल्याला घटनेचा मार्ग पुरेसा आहे. उलट सत्ताधार्‍यांना हिंसा सोयीची आहे. यामुळे आपल्या मूळ प्रश्‍नावरून सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळवायला संधी मिळते.

       2019 च्या पूर्वी  हिंसेचे वातावरण निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातील आणि यात पुन्हा हिंसा घडवून आणणारी डोकी वेगळी असतात आणि हात मात्र बहुजनांचे असतात हे आपण अनेक दंगलीत अनुभवले आहे. पण आता तरी शहाणे होऊया.  वंचित बहुजन समूहांच्या एकत्र येण्याच्या निमित्ताने फुले-आंबेडकरी चळवळ अधिक व्यापक करण्याची संधी  मिळाली आहे. ही ऐतिहासिक संधी चालून आली आहे. सोलापूरची धनगर समाजाची मोठी सभा आणि त्यानंतरची औरंगाबादची विराट सभा हेच दर्शवितात की, आता छोटे वंचित समूह जागे होत आहेत. त्यांना राजकीय आकांक्षा आहेत आणि आपले प्रश्‍न आपणच सोडवू हा आत्मविश्‍वास येत आहे. ‘आम्ही जागे झालो आहोत. आम्हाला आमचा मार्ग सापडला आहे.’  धनगर, छोटा-ओबीसी, मुस्लीम, आदिवासी आणि इतर सर्व वंचित समूहातील सार्‍यांची शक्ती उभारून आम्ही संसदीय लोकशाहीच्या मार्गाने सत्ता घेणार हा संकल्प करू या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या छोट्या-छोट्या समूहांना समोर ठेवून एक महत्त्वाचे सामाजिक-राजकीय सत्य सांगितले होते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता, सामाजिकदृष्ट्या अल्पसंख्य समाज राजकीयदृष्ट्या बहुसंख्य बनून सत्ताधारी बनू शकतो. आपल्या अनेक छोट्या समाजांना स्वतंत्र चेहरा नाही हे खरे आहे. पण सर्व वंचित समूह एकत्र आले तर तो चेहरा होऊ शकतो.  धनगर समाजातील अनेकांनी प्रथम हात पुढे केला. आरक्षणाचा प्रश्‍न आदिवासी समूहांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीनेच सोडवू ही भूमिका घेतली पाठोपाठ आता मुस्लीम समाजही सोबत आला आहे. हा प्रवाह मोठा झाला, तर तोच देशाचा मुख्य प्रवाह होऊ शकतो आणि आपण राजकीय बहुसंख्य सहज बनू शकतो हा विश्‍वास बाळगा.

By |2018-10-16T10:21:25+00:00ऑक्टोबर 16th, 2018|Editorial|0 Comments