वंचित बहुजनांनो राज्याची सत्ता हातात घ्या; वंचितांचा सोलापुरात एल्गार

सोलापूर :  राफेल विमान खरेदी प्रश्‍नावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संघर्ष करीत असताना शरद पवार मात्र मोदींना क्लीनचिट देतात, आता काँग्रेस पवारांसोबत किती खाली जाते हे बघायचे आहे, असा टोला मारून राज्याची सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हातात घ्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी  सोलापूर येथे केले. वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन सोलापुरातील पार्क मैदानावर झाले. त्याला संबोधित करताना अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. राज्यात मराठा आरक्षण मोर्चे आणि ओबीसी मोर्चे निघाले त्यातून दोन्ही समाजात कटुता निर्माण होण्याला काहींनी हातभार लावला आम्ही मात्र मैत्रीचा पैगाम देणारे आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्कयांवरुन सत्तर टक्के वाढवली पाहिजे, बहुजन समाजातल्या विविध घटकांचे अजून प्रश्‍न सुटले नाहीत, कुठवर वाट पहायची? त्यासाठी आपल्याच हाती सत्ता घेऊन आपणच आपले प्रश्‍न सोडवले पाहिजेत, असेही आंबेडकर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातला लहान व्यापार संपवायला निघाले आहेत, त्यांना संपूर्ण व्यापार अंबानीच्या घशात घालायचा आहे. मोदी अजगर झालाय, त्याला मारण्यासाठी व्यापार्‍यांचा जीव चिमणी एवढा आहे, आम्हाला साथ द्या या अजगराला आम्ही मारतो. यापुढे व्यापार्‍यांनी फक्त भाजप व संघाला निधी देणे बंद करावे, नरेंद्र मोदी चोर आहे हे मी हजारदा म्हणेल, काय करायची ती कारवाई करा, असे खुले आव्हान आंबेडकर यांनी सत्ताधार्‍यांना दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या अधिवेशनाला लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. या जाहीर सभेच्या मंचावर माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार अ‍ॅड. विजय मोरे, आ. बळीराम शिरस्कार, मा. आमदार हरिदास भदे, एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख, लेबर पार्टीचे अध्यक्ष बशीर अहमद, समीरउल्ला शेख, अश्‍विनी राठोड, राजन दीक्षित, भारिपचे प्रदेश  अध्यक्ष अशोक सोनोने, अकोला जि. परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, अर्जुन सलगर, शिवानंद हैदापुरे, प्रा.अविनाश डोळस, जयसिंग शेंडगे, डॉ. इंद्रकुमार भुसे, अरुण जाधव, शंकरराव लिंगे, शफी हुंडेकरी, डॉ. दशरथ भांडे, राजाभाऊ शिंदे, बबन जोगदंड, विष्णू गायकवाड, श्रीशैल गायकवाड, भारती कोळी, विश्रांती भुसनर आदी मान्यवर उपस्थित होते, माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे सभेच्या अध्यक्षस्थनी होते. या अधिवेशनाला राज्यातून दोन लाखावर लोक उपस्थित होते.

‘गली गली मे शोर है, पंतप्रधान मोदी चोर है’ हा 2019 च्या निवडणुकीत नवीन नारा असणार आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीत मोदींवरील भ्रष्टाचाराचा आरोप लावून धरणार असल्याचे आंबेडकर यांनी सुतोवाच केले. मराठा आरक्षण मोर्चामुळे मराठा-ओबीसी, मराठा-शेडूल्ड काष्ट, मराठा-आदिवासी यांच्यात भांडणे लावण्यात आली. मागासलेला या शब्दाची जोपर्यंत व्याख्या केली जात नाही, सामाजिक, आर्थिक आणि मागासलेपणाची तपासणी होत नाही आणि त्यामध्ये ही व्याख्या येणार असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होईल. 712 कोटींच्या राफेल विमानाचा करार 2014 मध्ये फ्रान्समध्ये होतो आणि त्यानंतर त्याच विमानासाठी 1600 कोटींचा करार होतो. यावरून नरेंद्र मोदींनी रिलायन्स कंपनीला घास भरविल्याचे स्पष्ट होते. राफेल विमानाची देखभाल दुरुस्ती आणि ते वापरण्याच्या स्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी 1 लाख कोटींचा खर्च होणार असून 1 लाख कोटी अंबानी यांच्या डिफेन्स कंपनीला जाणार आहेत. मुळातच डिफेन्सचे बजेट अडीच ते तीन लाख कोटींचे असताना त्यातील एक लाख कोटी रिलायन्सला दिल्यानंतर शिल्लक काय राहणार? यावरूनच राफेल विमानाची देखभाल कोण करणार? असा प्रश्‍नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

-

                                                  सोलापुर येथील पार्क स्टेडियम मैदानावर भर उन्हात उपस्थित जनसमुदाय…

अदानी, अंबानींच्या भल्यासाठी राफेलचा घाट
सर्वसामान्यांच्या पैशावर आजवर काँग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेनेने डल्ला मारला. फरक इतकाच, की काँग्रेस-राष्ट्रवादी उघड पैसे खात होते, तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार केला जातोय, असा आरोप ऍड. आंबेडकर यांनी सोलापुरात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात केला.  या मेळाव्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते. या वेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, 70 वर्षांच्या काळात सत्ताधार्‍यांनी काहींचे आरक्षण हिरावले तर काहींचे रद्द केले. आरक्षण, बेरोजगारी, व्यापार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. भीक नको सत्तेची… सत्ता मिळवू हक्काची… बहुजन सारे एक होऊया अन् सत्ता मिळवूया.’’

                                                   मंचावरुन उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करतांना अॅड. प्रकाश आंबेडकर 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा कार्पोरेट भ्रष्टाचार – अॅड. आंबेडकर
काँग्रेसवाले कोणतेही आढेवेढे न घेता सरळ-सरळ खायचे. परंतु, नरेंद्र मोदी हे आधी दुसर्‍याला खाऊ घालतात मग स्वतः खातात आणि त्यानंतर माझे हात बरबटलेले नाहीत, असं सांगून आपण स्वच्छ व प्रामाणिक आहोत, असा डांगोरा पिटतात, त्यामुळे नरेंद्र मोदींचे कॉर्पोरेट करप्शन आहे, असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.

‘गली गली मे शोर है, पंतप्रधान मोदी चोर है’
2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरीसुद्धा मी त्यांना चोरच म्हणणार. भाजपची मोदी लाट घालविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसमवेत काँग्रेसला घेऊ. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून भाजपवर टीका केली. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचे आरोप फेटाळले. त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादीसमवेत युती करणार का? त्यांची नीतिमत्ता पाहावी लागेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

                     पारंपरिक धनगर बांधवांच्या वेशात अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. 

 

भर उन्हात लोकांची उपस्थिती…
सभेला सुरुवात दुपारी दोनच्या सुमारास झाली. पार्क मैदानावर सकाळपासूनच बहुजनांची रेलचेल सुरु होती. प्रचंड ऊन्हात लोक बसुन होती. सभेची सांगता संध्याकाळी सहाच्या सुमारास झाली. तरीसुद्धा जनसुमदाय शेवटपर्यंत मैदानात बसून होता

अ‍ॅड. विजय मोरेंनी दिली उपस्थितांना शपथ
आरक्षण अधिवेशनाला उपस्थित जनसमुदायाला विजय मोरे यांनी शपथ दिली. आमचं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला असेल. आम्ही सत्तेत येऊन आमचे प्रश्‍न आम्हीच सोडवणार, असा निर्धार यावेळी उपस्थितांना केला.

लक्ष्मण माने – निवडणूक लढवणे हा पैसेवाल्यांचा धंदा झालाय. ते आपल्याला मोडीत काढायचा आहे. पंतप्रधान मोदी खोटरडे आहेत. ते ओबीसी असल्याचा खोटा प्रचार करतात. ते ओबीसी नाहीत. ते वैश्य आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ट केली. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

अरुण जाधव – महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे वादळ आले आहे. सत्ता परिवर्तन आणि वंचितांना त्यांचा सत्तेतील वाटा मिळवून देण्याचा हा लढा आहे. प्रसार माध्यमांमध्येे फक्त दलित आणि मुस्लीम एकत्र आले आहेत. असे चित्र रंगवले जातय. पण, वंचित आघाडीत भटक्या विमुक्तांच्या 42 जमाती, धनगर, ओबीसी हा सर्व समूह एकत्र आला आहे.

शिवानंद हैबतपुरे – महाराष्ट्र बसव परिषद आजच्या सभेत आपण सगळेजण एवढ्या उन्हात बसलोय. ऐवढे वर्ष ज्या प्रस्थापितांनी आपल्याला उन्हात ठेवले त्याला पुन्हा उन्हात घालवण्यासाठी आपण बसलोय. इथे जमलेले सर्व वेगवेगळ्या जाती, धर्माचे, समूहाचे आहेत. मात्र, इथे जमलेल्या सगळ्यांच्या वेदना सारख्या आहेत. त्या वेदनेच्या गर्भातून जन्माला आलेला हा कार्यक्रम आहे. इथून पुढे आम्ही निर्धार केला आहे की, स्वंयपाकी ही आमचाच असेल आणि वाढप्याबी आमचाच असेल. सोलापूर हे चळवळीचे केंद्र आहे. महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात स्वंतत्र लिंगायत धर्माची स्थापना केली. त्या लिंगायत धर्माचा प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे. हे सांगण्यासाठी मी इथे आलोय.

 

By |2018-10-06T10:37:34+00:00ऑक्टोबर 6th, 2018|Our News, Featured|0 Comments