…म्हणून युती !

– अॅड. प्रकाश आंबेडकर 

      इतिहास विसरलो, त्यातील सत्य लक्षात घेतले नाही, तर वर्तमानातील वाटा चुकतात. गोलमेज परिषदेत महात्मा गांधी यांनी आपले नेतृत्व कायम राहण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ‘अस्पृश्यांना’ मुसलमानांसारखे, शिखांसारखे वेगळे हक्क मिळू नयेत अशी भूमिका घेतली. म.गांधी यांचा ब्राह्मण नेतृत्वाबरोबर लढा होता आणि त्यामुळे सवर्ण हिंदुना जी अपेक्षा आहे ती पूर्ण करणे त्यांना गरजेचे होते आणि त्या गरजेपोटी त्यांनी अस्पृश्यांसाठी ‘विभक्त मतदारसंघ’ या संकल्पनेस कडाडून विरोध केला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकाकी लढ्याला साथ जर कोणी दिली असेल, तर ती बॅरिस्टर जिन्ना यांनी. बॅरिस्टर जिन्ना यांनी म. गांधीच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही त्यांचा किती प्रभाव ब्रिटीश सरकारवरती पडला या संदर्भातील माहिती अधिकृतरीत्या उपलब्ध  नाही. पण, एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे की, भारतातील मुस्लीम समाज म.गांधीच्या भूमिकेशी सहमत नाही. हा प्रतिकात्मक संदेशसुद्धा तत्कालीन व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारला ख्रिश्‍चनांच्या शिकवणीप्रमाणे ज्याच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घ्यावी लागली. नंतरचा इतिहास आपल्या सर्वाना माहीत आहे. एकंदरीत नव्या किंवा सध्याच्या परिस्थितीत मी पाहतो की, तेव्हा म. गांधी यांचा लढा हा काँग्रेसमधल्या नेतृत्वस्थानी असलेल्या ब्राह्मण मंडळींशी होता. गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित असलेले हिंदू महासभेच्या प्रतिनिधींच्या जे कट्टर ब्राह्मण्यवादाचे प्रतिनिधी होते. त्यांच्या हातात नेतृत्व जाईल या शंकेपोटी किंवा भीती पोटी तडकाफडकी निर्णय घेवून अस्पृश्यांच्या राखीव जागांना हिंदूमधील फूट मानून त्यांनी विरोध केला असू शकतो. केव्हातरी या संदर्भात सविस्तर लिहावे लागेल.

     तूर्त परिस्थितीत आत्ता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) बरोबर झालेल्या युतीच्या  संदर्भात लिहिणे आवश्यक आहे. तो एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाबरोबर बरोबर वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. त्याबद्दल नुसता विरोधच नाही, तर द्वेषही व्यक्त केला जातोय. काही बहुजन खुलेपणाने लिहतात त्यांचे मी स्वागत करतो. कारण, त्यांच्या डोक्यामध्ये कुठल ‘डबक’ आहे हे तरी बाहेर पडले. काही संघटना आहेत की, ज्या लिहीत नाहीत. पण, ’बैठकी’मधून विषारी आणि विखारी प्रचार  करताहेत. या सर्व मंडळीना एक साधा, सोप्पा आणि सरळ प्रश्‍न आहे की, जे काम वंचित बहुजन आघाडी करायला निघाली आहे, ते काम आपण आतापर्यंत का केले नाही. मुसलमानांचा द्वेष, तिरस्काराची भावना, मुसलमानांबद्दल गैरसमज पसरविणे हा तर या प्रतिगामी संघटनांचा जुना धंदा आहे. तिच त्यांची भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून ज्यांनी बौध्द धर्म स्वीकारला त्यांच्याही बाबतीत आहे. ते ‘आपले’ नाहीत असा प्रचार करत त्यांनाही वाळीत टाकण्याचा प्रयत्न नेहमीच चालू आहे. हे मी समजू शकतो की, हे दोन्ही समूह ब्राह्मण्यवाद्याच्या विरोधात आहेत. पण, कुंभार, लोहार, सोनार, न्हावी, शिंपी, भटके विमुक्त, कोळी, साळी, तेली, म्हसन जोगी, सुतार इ. यांनी कधीही ब्राह्मण्यवाद्याला सरळ सरळ आव्हान दिले नाही, पण त्यांनी ब्राह्मण्यावादाचा मनाने स्वीकारही केला नाही. त्यांची या वर्चस्ववादाशी असलेली असहमती दाखवण्याची वृत्ती आणि पद्धती वेगळी होती, मार्ग वेगळा होता. त्यांनी आपापल्या समूहाची ओळख आणि त्यांच्या मनातील आणि व्यवहारातील धर्माची संकल्पना ही वारकरी संत परंपरेशी जोडली.  गोरोबा कुंभार, संत नामदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत चोखोबा यांचे  आम्ही अनुयायी आहोत आणि हीच आमची ओळख आहे ही भूमिका या मध्यमजातीय समुदायांनी घेतली. पण ही ओळखही आपापल्या समुदायाच्या संतांपुरती मर्यादित न ठेवता इतर जातीतील संतांशी जोडून सर्व समावेशक वारकरी संत परंपरा निर्माण केली.  हा समूह स्वत:चा धर्म हिंदू आहे असेच सांगतो. मग इथल्या ब्राह्मण्यवादी हिंदूनी आणि जातीच्या नावाने स्वातंत्र्यानंतर जे सत्तेवरती आले त्यांनी या समूहाला  विकासाच्या, प्रतिष्ठेच्या, व्यवहाराच्या, मंदिराच्या आणि एकूण सत्तेच्या बाहेर का ठेवले?  हा समूह या देशातला 35 टक्के आहे. गेल्या 70 वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आले की, आपण फसवले, गंडवले जात आहोत, लुबाडले जात आहोत आणि आपले अस्तित्व नाकारले जात आहे, हा सर्व समाज हा बहुजन समाज आहे, ज्याला सध्याच्या भाषेत ओबीसी म्हटले जाते. जे आज टीका करत आहेत त्यांनी स्वत:च्या इतिहासाचे परीक्षण करावे.

     इतिहासकालीन तुमच्या पूर्वजांनी बहुजनांना केवळ वापरले आणि व्यवस्था टिकविण्यासाठी वापरण्यापर्यंतच मर्यादित ठेवले. लाभ देणेे तर दूरच ! आज तुम्हीही त्यांचा वापर करत आहात वेगळे काय करताहात?  मग ते लेबल कधी काँग्रेसचे असते तर कधी शिवसेना, भाजपा किंवा  मनसेचे, पण त्याने  काय फरक पडतो? ही तुमची वृत्ती, तर खरी मनुवाद्यांची आहे. समाजव्यवस्थेतील आपले वर्चस्व टिकवणे हा त्यांचा कायमस्वरूपी अजेंडा आहे. मग त्यासाठी काहीही. याच मनुवाद्यांनी तुर्क, मोगल पठाण आले, त्यांच्याशी तह केला. राजसत्ता तुम्ही उपभोगा पण, आमच्या व्यवस्थेत, धर्मात ढवळाढवळ करू नका. त्यातील मोगलांचे 700 वर्ष राज्य राहिले, तरी मोगलांनी समता प्रस्थापित केली नाही पण, इस्लामच्या तत्वाप्रमाणे अत्याचार होणार्‍यांच्या बाजूने शक्य तेव्हा उभे राहिले. ते राज्य करायला आले होते. त्यांनी मनुवाद्यांना सत्तेत दुय्यम शासक म्हणून सहभागी करून घेतले आणि इथली उतरंडीची मनुवादी व्यवस्थेत फार ढवळाढवळ करता राज्य केले. त्यानंतर ब्रिटीश आले, या ब्रिटिशांना मदतीचे कार्य इथल्या सुरुवातीला वंचित समुहाने केले. पण, ज्या वेळेस ब्राह्मण्यवाद्यांच्या लक्षात आले की, आपण आता ब्रिटीश सत्तेसमोर टिकू शकत नाही. आपले वर्चस्व कायम ठेवायचे असेल, तर ब्रिटिशांशी बोलून, त्यांच्या आधुनिक गोष्टींचा लाभ घेऊन आपली ताकद वाढवली पाहिजे असे ब्राह्मण्यवाद्यांनी ठरवले आणि त्यावेळेस ब्रिटीशांशी तह केला. आरएसएस नावाची संघटना हिंदू महासभेच्यामार्फत जन्मास आणली आणि म्हणून कालांतराने हिंदू महासभा संपली आणि आरएसएस टिकली. जिने कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. आज प्रश्‍न हा उभा राहतोय की, बिटिशांच्या कालावधीमध्ये ब्राह्मणशाहीला आव्हान म. फुल्यांनी उभे केले, शाहू महाराज, डॉ.आंबेडकर यांनी त्याला स्वरूप आणि आकार दिला. तरीही ब्राह्मण्यवादाने  हार मानली नाही. तो आजही चिकाटीने स्वत:चे पुनर्जीवन करतोय स्वत:ला टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय. स्वत:ला टिकवत असतांना त्यांना पुन्हा एकदा मुसलमानांचा ’आधार’ घ्यावा लागतो आहे. मुसलमानांना शत्रू म्हणून उभे केल्याशिवाय यांना बहुजनांना गुंगवून-गुंतवून ठेवता येत नाही.  या विखारी आणि विषारी प्रचारामध्ये एआयएमआयएम ही मुसलमानाची संघटना आहे म्हणून ती हिंदू विरोधी आहे आणि ‘आपल्यासोबत’ असू शकत नाही असे गोबेल्सच्या पद्धतीने सतत प्रचारले जाते. पण आरएसएस ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यावाद मानणार्‍यांचे हित जपत नाही का? इथली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमंत मराठ्यांचा इंटरेस्ट जपत नाही का? कम्युनिस्ट पक्ष हा कामगारांचा इंटरेस्ट जपत नाही  का? रिपब्लिकन चळवळ पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचा प्रश्‍न आणि त्यांचे हितसंबंध जपत नाही का? सर्वच संघटना आणि पक्ष विशिष्ट समूहाचे किंवा गटांचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीत हे अपेक्षितच आहे. पण या गटांचे प्रतिनिधित्व करत असताना ते देशाचे नागरिक असतात आणि देशाचेही प्रतिनिधित्व करत असतात. ज्यावेळी गटाचे हितसंबंध आणि देशाचे हितसंबंध यात निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा देश मोठा असतो. एआयएमआयएमविरुद्ध जे विखारी आणि विषारी प्रचार करत आहेत त्यांना माझा सरळ साधा सवाल आहे की, या देशातल्या ज्या काही मुस्लीम संघटना आहेत त्यांनी कधी ही ‘वेगळ्या राज्याची’ मागणी केली आहे का ? देशापासून वेगळे होण्याची भाषा वापरली आहे का? आम्हाला संविधान किंवा संविधानावर आधारित समाज आणि राज्य व्यवस्था मान्य नाही अशी भूमिका कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणेे घेतली आहे का? याबद्दल विखारी टीका करणार्‍या संघटना मौन पाळून आहेत. ‘संपूर्ण वंदे मातरम’ म्हणायला विरोध आहे म्हणून ते राष्ट्रविरोधी हा प्रचार केला जातो. मी वंदे मातरमच्या निर्मितीच्या खोलात जात नाही आणि जाण्याची इच्छाही नाही. तो बकिंमचंद्र चटर्जी यांचा अवमान होईल. पण या देशाच्या  संविधान समितीने रवींद्रनाथ टागोर याचं ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणून मान्य केले आणि तेच भारताचे राष्ट्रगीत आहे. ते म्हणायला देशातील कोणत्याही मुस्लीम संघटनेने नकार दिल्याचे मी ऐकलेले नाही. आता ‘जन गण मन’ ऐवजी आरएसएसच्या संघटनेने ठरविले की, वंदे माताराम गायले तरच तुम्ही राष्ट्रप्रेमी  आहात. अन्यथा तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. मुळात, ‘वंदे मातरम’  म्हणायला सक्तीने  भाग पाडणे हाच संविधान समितीचा अपमान आहे.  आरएसएसच्या दीड शहाण्यांचे ऐकायचे की, राजकीय, सामाजिक स्वातंत्र्यांच्या लढ्यामध्ये सहभागी होवून ज्यांनी संविधान समिती प्रस्थापित केली. त्या संविधान समितीने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत असेल हा निर्णय घेतला. संविधान समितीचा निर्णय डावलून ‘वंदे मातरम’ म्हणा ही सक्ती म्हणजे संविधान समिती आणि त्यावेळी स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. ब्राह्मण्यवाद्यांनी आपले वर्चस्व टिकावे म्हणून सर्वांनाच अपराधी भावनेत नेऊन ठेवण्याचा खटाटोप चालवला आहे. आरएसएसचे दीड शहाणे पुन्हा हीच थेअरी इतरांवर ‘वंदे मातरम’च्या निमित्ताने वापरत आहेत. आता हा प्रचार जोरात करतील. असे अनेक खोटे विषारी प्रचार आता जोरात होतील आणि वर उल्लेख केलेल्या लहान समूहांचे (मध्यम जातींचे) डोके खराब (ब्रेन वॉशिंग) केले जाईल.

       मागच्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्यांच्या काळात आणि विशेष करून मंडल आयोग लागू झाल्यानंतर नव शिक्षित, नव उद्योजक आणि नव्याने अधिकारी झालेला वर्ग यांच्या विषारी आणि विखारी प्रचाराला प्रश्‍न विचारायला लागला की, मी इथल्या मुसलमानाबरोबर जावू नये असे वाटते, तर ब्राह्मण्यावादाने माझ्यासाठी काय केलय ? देवळात प्रवेश आहे, दर्शन तर घेतोच पण,समोर कुलूपबंद दानपेटी ठेवली आहे. म्हणजे, माझ्या दर्शनाची किंमत अप्रत्यक्षपणे मागितली जाते. पण माझा हक्क काय? मी त्या पूजेचा आणि दानपेटीचा हकदार झालो पाहिजे. यासाठी वर्चस्ववाद्यांनो आपण काय केले? हे विचारल्यावर हे ब्राह्मण्यवादी चूप बसतात. 70 वर्षाच्या कालावधीत 15 लोकसभा निर्माण झाल्या. या 15 गठीत झालेला लोकसभेत वंचित बहुजनांचा चेहरा-अस्तित्व कुठेच नाही. तिच गत विधानसभेमध्ये आहे. ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच होण्याची संधी होती तीसुद्धा या ब्राह्मण्यवाद्यांनी संपवली. त्यामध्ये सरळ सरपंचाची निवडणूक आणि सदस्यामध्ये बहुपद्धती (प्रभाग) आणून आमचा होता तो ही सहभाग संपवला. आमचे  हे संपवलेले अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी  राजकीय संघर्ष करत असताना वंचित बहुजन आघाडीला मुस्लीम संघटना पाठिंबा देत असतील, तर या ब्राह्मण्यवादाच्या पुरस्कर्त्यांच्या पोटामध्ये का दुखायला लागले? आमचा  सवाल आहे की, हे  ब्राह्मण्यवादी आम्हालाही या देशातला नवा मुसलमान म्हणून बघत आहेत का?

By |2018-10-06T08:14:29+00:00ऑक्टोबर 6th, 2018|Editorial|0 Comments