मिलींद महाविद्यालयाचा मिनॅन्डर गेला !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये मिलींद आणि मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन केले. ‘’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिलींद महाविद्यालयामध्ये मिनॅन्डर निर्माण व्हावेत असे वाटत होते‘’. बाबासाहेबांचे हे स्वप्न प्रा. अविनाश डोळस  यांच्या रुपाने वास्तवात खरे ठरले. असे मत काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रा. जयदेव डोळे यांनी कालकथित प्रा. अविनाश डोळस यांच्या बाबतीत व्यक्त केले होते…

   ‘’अरे जितरत्न, तुला लेख मी कुरीअरने पाठवला आहे. उद्या सकाळपर्यंत तुला मिळेल. लेख मिळाला की, कळव आणि काही दुरुस्त्या असतील तर करुन घे‘’… प्रा. अविनाश डोळस आणि माझ्यातला हा शेवटचा संवाद… डोळस सर कामानिमित्त हैदराबादला होते आणि एका महत्त्वाच्या विषयावर प्रबुध्द भारतासाठी लेख हवा होता. जो की, डोळस सर लिहू शकणार होते. दिवसभर त्यांचा फोन बंद होता म्हणून मी एसएमएस करुन ठेवला होता. रात्री 11.30च्या सुमारास सरांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की, तुझा निरोप मला मिळाला. माझ्याकडे लेख डिक्टेड करणारा कोणी नाहीये. म्हणून मी हाताने लिहून पाठवला आहे. तो तु टाईप करुन घे आणि प्रबुध्द भारतमध्ये छापा…

     अविनाश डोळस सर म्हणजे, सदैव हसतमुख असणारे व्यक्तिमत्व. सरांसोबत बोलणे म्हणजे एक पर्वणी असायची. काही महिन्यांपूर्वी गोव्याला सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिबिरासाठी आम्ही गेलो होतो. त्या शिबिराच्या उद्घाटन सत्राला अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार होते. बाळासाहेब आंबेडकरांनंतर डोळस सर सलगपणे दोन ते तीन तास आंबेडकरवाद आणि आजच्या तरुणांची भूमिका, वाटचालीबद्दल बोलत होते आणि आम्ही सर्व मंत्रमुग्धपणे एेकत होते. सर म्हणजे, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक. अनोळखी व्यक्तिलाही आपलसं करणार व्यक्तिमत्व म्हणजे डोळस सर.

गोव्यातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिबिरात अॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अविनाश डोळस, महेश भारतीय आणि इतर सहकारी व विद्यार्थी

   गोव्यामध्ये एका रात्री आम्ही सर्वजण क्रुझवर फिरायला गेलो होतो. सोबत महेश भारतीय, हमराज उइके, प्रबुध्द भारतचे संजय धावारे, डोळस सर व सर्व विद्यार्थी होतो. त्या तीन तासाच्या सफरीमध्ये प्रबुध्द भारत, भारिप बहुजन महासंघ, आंबेडकरी चळवळ आदी विषयांवर सरांसोबत भरपुर बोलत होतो. प्रबुध्द भारत नव्याने जोरदारपणे सुरु आहे याचा सरांना प्रचंड आनंद होता. नवीन तरुण पीढी जबाबदारी घेतेयं. ही आनंददायी गोष्ट असल्याचे सरांनी नमुद केले होते. जे की माझ्यासाठी सुखावणारी बाब होती.

     भारिप बहुजन महासंघाच्या स्थापनेपासून डोळस सर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका तळागळातल्या लोकांना,  प्रसार माध्यमांवर ठणकावुन सांगत होते. डोळस सर आजच्या पिढीतील आंबेडकरवादी तरुणांसाठी एक आदर्श होते. ज्येष्ठ साहित्यीक अर्जुन डांगळे यांनी डोळस सरांचा ‘’आंबेडकरवादी साहित्य आणि राजकीय चळवळीचे प्रवक्ते म्हणून गौरव केला आहे’’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ राज्य सरकारच्यावतीने प्रसिध्द करण्यात सरांचा मोठा वाटा आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, गायरान जमीनीच्या लढ्यातही सरांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील लढाई करतांना कौटुंबिक जबाबदारीदेखील सांभाळा हा सरांचा कानमंत्र मला खूप महत्त्वाचा वाटतो.  डोळस सरांना मी शेवटचे टी.व्हीवर बघितले. ते वंदे मातरमच्या मुद्यांवरुन माध्यमांनी राळ उठवली असतांना विरोधकांना प्रकाश आंबेडकरांची भूमिका शांतपणे समजावून सांगणारे डोळस सर आज आपल्यात नाहीत हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे.

        आंबेडकर भवन पाडल्यानंतर भरपावसात निघालेल्या मोर्च्यात अॅड. प्रकाश आंबेडकरांसोबत प्रा. डोळस सर…

आज डोळस सरांबद्दल बोलतांना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अविनाशने माझ्याकडे कधीही स्वतासाठी काही मागितले नाही, जे मागितले ते कार्यकर्त्यांसाठी. असा निस्वार्थी सहकारी चळवळ अर्ध्यात टाकून गेला ही मनाला खिन्न करणारी बाब आहे…

मोक्याच्या क्षणी सहकारी निघून जाणे हे खूपच धक्कादायक आहे. आज समाजामध्ये एवढी सामाजिक, राजकीय घुसळण होत असतांना डोळस सरांच आपल्यात नसणं हे प्रचंड क्लेशदायी आहे. सरांच्या अकाली जाण्याने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर आपण सदैव आमच्यात आहात.. या भाबड्या आशेने तुम्हाला विनम्र अभिवादन

आपलाच विद्यार्थी –
जितरत्न पटाईत

                                       प्रबुध्द भारत परिवारातर्फे आपणांस शेवटचा क्रांतीकारी जयभीम…

By | 2018-11-11T12:01:12+00:00 नोव्हेंबर 11th, 2018|Opinion|0 Comments