मराठा तरुणांच्या आत्महत्या रोखण्याचे आव्हान फुले-आंबेडकरी चळवळ पेलू शकेल का ? खुले पत्र

भाग – 5

– शांताराम पंदेरे

प्रिय फुले-आंबेडकरी सहकारी,

सप्रेम जय भीम!

     मराठा तरुणांच्या आत्महत्या या विषयावरील आजवर मी चार भागात लेख लिहिले. यातून फक्त काहीच मुद्दयांना स्पर्श केला आहे. माझ्या लेखाखालील फोनमुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी मला फोन करतात. सध्यातरी फक्त बापू किंवा सर, जय भीम! अशी सुरुवात करून खूपच चांगले विचार, मांडणी, जबरा लिहिले आहे अशा प्रतिक्रिया देत आहेत. माझे जुने सहकारी बापू-जय भिम! म्हटल्याबरोबर कळून येतात. पण मला सर म्हटले की, कळते हा नवीन तरुण सहकारी आहे. बरीच चर्चा सुरू असताना तो मध्येच म्हणतो सर, ‘‘मी भारिपचा कार्यकर्ता आहे. मी पाथर्डीचा कोल्हाटी समाजातील एक कार्यकर्ता, बंजारा समाजाचा कैकाडी समाजाचा’’, आदी असे बोलू लागतो. पुढचे महत्त्वाचे म्हणजे तो मी हा लेख गावातील ओळखीच्या मराठा तरुणाला वाचायला देतो असे जेव्हा बोलतो, तेव्हा लेख लिहिण्यामागील उद्दिष्ट हळूहळू का होईना पण सफल होत आहे हे दिसत आहे. बसल्या जागेवर माझा सर्वांशी संपर्क, संवाद होत आहे. खूप बरं वाटतं. यावरून असे दिसते की, आपली सर्वांची जबाबदारी पूर्वीपेक्षा खूपच वाढली आहे. म्हणून आताच आपणाला हे खुले पत्र लिहीत आहे. हा उपदेश अजिबात नाही. किंवा हा माझा उत्तर द्यायचा अजिबात हेतू नाही. तो माझा अतिशहाणपणा होईल याची मला जाणीव आहे. मी फक्त या निमित्ताने काहीच मुद्दे उभे करत आहे. या व आपणाला वाटणार्‍या आणखी नव्या मुद्दयांवरही आपण नुसती छान अशी प्रतिक्रिया न देता आपणही लिहावे. बोलावे व ‘प्रबुध्द भारत’कडे या नव्या मुद्दयांवर लिहून कळवावेत. मात्र आपल्या (छान अशी प्रतिक्रिया सोडून) लिखित प्रतिक्रिया प्रबुध्द भारताकडे पाठवाव्या ही विनंती.

शेती, पाण्यासह आणखी काही महत्त्वाच्या मुद्दयांवर लवकरच लिहिणार आहे. त्यानंतर ओबीसी, भटके-विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांना खुले पत्रही लिहिणार आहे. फुले-आंबेडकरी चळवळीला मराठा आत्महत्येेचे आव्हान स्वीकारायचे असेल, तर मागील तीन दशकांपासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. त्या अजून तरी थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. यात यंदा भर पडली मराठा तरुणांच्या आत्महत्यांची. आजी-माजी सत्ताधारी, पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष, संघटना या आत्महत्या रोखू शकल्या नाहीत असेही लिहीले आहे. मग माझ्यासमोर एक गंभीर प्रश्‍न उभा राहिला. फुले-आंबेडकरी चळवळ तरी या आत्महत्या रोखू शकेल का? हे आव्हान ते स्वीकारू शकेल का? यावर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी फुले- आंबेडकरी चळवळीसमोर कोणकोणती आव्हान समोर आहेत? याचा प्रथम विचार करावा लागेल. त्या आधी फुले-आंबेडकरी विचाराच्या जमेच्या बाजू काय-काय आहेत? ते पाहू या.

अ)   फुले-आंबेडकरी विचाराच्या जमेच्या बाजू

1) महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे माणसाला शिक्षण घेण्याची जबरदस्त प्रेरणा मिळते.

2) बुध्द, कबीर, फुले, गाडगेबाबा, अण्णा भाऊ साठे, तंट्या भिल, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, मौलाना अबुल कलाम आझाद, आदी जातीबाहेरील परंपरा व गुरू मानणारी एकमेव चळवळ.

3) नवराष्ट्र उभारणीत भरीव कार्य. लोकशाहीचा पाया मजबूत  करणारी राज्यघटना देशाला दिली आहे.

4) हा एकमेव विचार-चळवळ प्रथमपासून उघडपणे भारतीय राज्यघटना मनापासून स्वीकारून तिच्या संरक्षण व संवर्धनाचा विचार सांगते.

5) जय-पराजय, विद्वेषाच्या पलीकडचा विचार व चळवळीची महान परंपरा,

6) अन्याय, वर्ण-जाती आणि स्त्री-पुरुष विषमता आणि येथील व्यवस्थेविरुध्द घटनेच्या अहिंसक मार्गाने लढण्याची सततप्रेरणा देतात.

7) हे विचार वाचून-समजून घेण्याची जबरदस्त भूक लागलेला पूर्वास्पृश्य आणि बौध्द हा एक मुख्य समाज आहे. तो आज या चळवळीचे नेतृत्व करत आहेत. हा समाज जिथे जिथे जमतो; तिथे तिथे भारतातील सर्वात जास्त ग्रंथ खरेदी-विक्री व छपाई होते. आणि यातील सर्वाधिक स्त्री-पुरुष हे निरक्षर आहेत. हा एक जागतिक चमत्कारच आहे!

8) फुले-आंबेडकरी विचार हा स्त्रीशूद्रातिशूद्र विद्वेषी ब्राह्मणी धर्म-परंपरा नाकारणारा एक प्रमुख विचार आहे. मात्र याच अतिरेकी ब्राह्मणी धर्म-परंपरेला संघपरिवार हिंदू धर्म म्हणतो. त्याला उघडपणे आव्हान देवून अंगावर घेणारा एकमेव समाज म्हणजे बौध्द समाज! आणि हा प्रमुख विचार आहे !  आपल्या मुला-मुलींची शाळेत नोंद करताना संघाच्या ब्राह्मणी-(हिंदू)  धर्मातील स्त्रीशूद्रातिशूद्रसमूह जातीच्या कॉलममध्ये मराठा-हिंदू, धनगर-हिंदू, गवळी-हिंदू व धर्म हिंदू म्हणून लिहितात. ते पालक बहुसंख्य निरक्षर. मग हे कोण लिहिते? ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेत शिकलेली ही हिंदू माणसे!-शिक्षक-अधिकारी-नोकरशाही! दाढी, कान न टोचलेले, मंगळसूत्र न घातलेले, बेनझीर-सलीलसारखी नांव असलेल्या, तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र नसलेले पाहून तू  मुसलमान, बौध्द, ख्रिश्‍चन आहेस का? या संशयित भावनेने पाहिल्यावरच हा सामान्य माणूस स्वत:ला हिंदू म्हणून सांगतो. रोजच्या व्यवहाराला हा माणूस आमचे हे असे जिकरीचे जीवन-व्यवहार आहे. राबल्याशिवाय चूल पेटत नाही. असे तो सहज सांगून जातो. या रोजच्या जीवन व्यवहारात त्याचे कधीच मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौध्द समाजातील माणसांशी काहीही भांडण नसते. मात्र मूठभर (शिस्तीच्या कवायतीतील) संघ स्वयंसेवकाच्या मनातील हा कपटी डाव सामान्यांना कसा कळणार? याची हिंदू धर्माची समज आणि संघाचा ब्राह्मणी धर्म-हिंदू धर्म यात काडीचाही संबंध नसतो. मात्र संघ परिवार त्यांच्या या हिंदू धर्माचा सुमडीत प्रचार-प्रसार करत आला आहे! करोडो मुखांनी, हातांनी त्याचे हे काम चालू आहे. ही विद्वेषी ब्राह्मणी धर्म-परंपरा फुले-आंबेडकरी विचार संपूर्णत: नाकारतो.

9) याच परंपरेमुळे हिंदू धर्मातील या शोषित-उपेक्षित व मुस्लीम समूहांना स्वत:च्या विचार-व्यवहारांना काही प्रमाणात मुरड घालून बौध्द समूहातील फुले-आंबेडकरवादी कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या आपल्यासोबत घेवून व्यापक वंचित-बहुजन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

10) सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पण सक्ती नसलेला एक प्रमुख धम्म विचार-पर्याय तो देशातील बहुविविधता मानतो.

11) मागील तीन दशकांपासून पूर्वास्पृश्य समाजातील-फुले-आंबेडकरी नेतृत्व सर्वांनी विशेषत: वंचित-बहुजन जनतेने मान्य करण्याची मोठी प्रक्रिया गतिमान झालेली आहे. याचा अर्थ ते फुले-आंबेडकरी विचारांचे बनले असे नाही. हे समाज प्रथम सत्तेच्या मार्गानेच फुले-आंबेडकरी विचार-चळवळीजवळ येणार आहेत.

12) ग्रामपंचायत-पंचायत- जिल्हा, न.प., मनपा आणि काही राज्यात संपूर्ण बहुमत मिळून स्वत:च्या शक्तिवर सत्ता मिळवत आहेत. आपली मते ट्रान्सफर करीत आहेत. पण अन्य समाजाची मते आपल्याला कशी मिळतील यासाठी काय काय केले पाहिजे याचा काँग्रेसी पध्दतीनेच विचार करत आहे. त्यामुळे ही मते फार काळ आंबेडकरवाद्यांसोबत टिकली नाहीत.

13) फुले-आंबेडकर चळवळीला भूमी हक्क चळवळीची दीर्घ परंपरा आहे. शेतकरी आणि मराठा तरुणांच्या आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर फुले-आंबेडकरी चळवळ या आत्महत्या रोखू शकेल काय? हे आव्हान रोखू शकेल काय? हे पाहताना या चळवळीच्या काही मर्यादाही समोर येत आहेत. त्या पुढीलप्रमाणे-

आ)  फुले-आंबेडकरी चळवळीच्या मर्यादा –

1)   फुले-आंबेडकरी चळवळीची सर्वसामान्यांमध्ये फक्त राखीव जागा आणि धर्म नाकारणारी आक्रमक चळवळ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. याला कोण जबाबदार आहे?

2)   या चळवळीने सत्तेपासून वंचित समूहांबरोबरच सत्ताधारी मराठा जाती समूहांतील दुष्काळ, पाणी आदी प्रश्‍न आणि गरीब-कष्टकरी-कोरडवाहू शेतकर्‍यांशी संवाद करून त्यांच्या शेतिविषयक प्रश्‍नांना हात घातला नाही. किंबहुना जमीन हक्क मिळालेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांना स्पर्श केला नाही. त्यादृष्टीने जोतीरावांची शेतकर्‍याचा असूड, प्राथमिक शिक्षण-दुष्काळविषयक भूमिका आणि ‘‘जातिनिहाय घाणेरडी कामं सोडा. गाव सोडा आणि शहराकडे चला’’ असा बाबासाहेबांनी पूर्वास्पृश्यांना दिलेला सल्ला आणि डॉ. आंबेडकरांचा जमिनीच्या छोट्या तुकड्यांचा प्रश्‍न, आजच्या शेतकरी-मराठा तरुण आत्महत्यांंशी असलेला संबंध फुले-आंबेडकरी चळवळीने हाताळले नाहीत.

3) सत्ता असो वा नसो पण वरील आणि अन्य महत्त्वाच्या मुद्दयांवर फुले-आंबेडकरी योग्य पर्याय जनतेसमोर मांडले नाहीत.

4) गाव ते विधानसभा आमदारकीपर्यंत सत्ता आल्यानंतरही काँग्रेससारखेच अंमलबजावणीचे मॉडेल राहिले. आपले स्वत:चे असे फुले-आंबेडकरी अंमलबजावणीचे मॉडेल त्याची प्रक्रिया विकसित केली नाही. बहुसंख्य चळवळ नेते याच प्रभावाखाली आहेत.

5) आपल्या सत्तेची फुले-आंबेडकरीदृष्टीने छाप पाडणे अजून जमलेले नाही.

6) सत्तेसाठी का होईना पण जे ओबीसी-आदिवासी, आदी समूह फुले-आंबेडकरवाद्या जवळ आले; त्यांना कायम सोबत ठेवून; त्यांना विचाराने जवळ कसे घ्यायचे हे अजून कळलेले नाही. केवळ आक्रमकता, ब्राह्मणी धर्माऐवजी सरसकट हिंदू धर्मावर टोकाची टीका करणे आणि सर्व सामान्यांना दुखावणे. त्याचबरोबर सत्ताधारी, मुजोर मराठा घराण्यांबरोबरच ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही अशा कष्टकरी, कोरडवाहू मराठा शेतकरी समूहाला वारंवार दुखावणे. प्रत्येकवेळी आंदोलनासाठी अत्याचार होण्याची वाट पाहणे. या अराजकीय वृत्तीमुळेच फुले-आंबेडकरी चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त न होता केवळ सामाजिक , भावनिकच राहिली आहे.

7)   1932च्या आधीचे बाबासाहेबांचे विचार बाकी समूहांना वर्ण-जातिव्यवस्थेचे अमानवी स्वरूप समजावून देण्यावर भर होता. त्यामुळे आताच्या संदर्भात एकदम 1956 ला उडी घेवून चालणार नाही. यात अजूनही फरक केला जात नाही. केवळ ब्राह्मणांवर कुणी टीका केली आणि आंबेडकरांचे नाव घेतले की, फुले-आंबेडकरी समूह प्रचंड टाळ्या मारतो. हे टाळले पाहिजे. त्यामागील त्यांचा सामाजिक-राजकीय हेतू, दृष्टी ओळखण्यात चळवळ कमी पडत आहे.

8) नव्या संदर्भात गांधी आंबेडकर-लोहिया यांचा एकत्रित विचार करत नाही. इतिहासाचा कालखंड व आताची परिस्थिती एकच मानली जात आहे.

9)   सत्ताधार्‍यांना सोयीचे फक्त आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देणे, आंदोलनकर्ते व शेतकरी आत्महत्यानंतरच्या मागणीला प्रोत्साहन देणे फारसे उपयोगी आणि टिकावू नाही.

10)  आजवर एखादा अपवाद सोडल्यास सारी चळवळ भावनिक, प्रतिक्रियात्मकच राहिली.

11)  फुले-आंबेडकरी चळवळ सामाजिकच राहिली. एखादा अपवाद सोडल्यास राजकीय व्यापक बनली नाही. स्वतंत्र आंबेडकरी राजकारण केलं नाही.

12)  बाळासाहेब आंबेडकर, कांशीराम, मायावती, मुलायम, लालूप्रसाद यादव व अन्य रिपब्लिकन नेते यात नेमका काय फरक आहे. यावर गांभिर्याने विचार नाही.

हे आव्हान पेलण्याची क्षमता कुणात आहे  ?  का ?

     फुले-आंबेडकरवादी विचार आणि चळवळीच्या मर्यादांच्या पार्श्‍वभूमीवर हे आव्हान पेलण्याची क्षमता कोणाकडे आहे हा खरा प्रश्‍न आहे. उत्तर प्रदेशामधील बसपा आणि महाराष्ट्रातील अकोल्यासह मध्य महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाचा विचार करता काय दिसते ? एक नक्की की, आता वर उल्लेखलेली परिस्थिती आणि आजवरची बाळासाहेब आंबेडकरांची भावनेपलीकडची वैश्‍विक-राष्ट्रीय प्रश्‍नांबाबतची सातत्यपूर्ण भूमिका व कार्यक्रमांमुळे एका मोठ्या जनसमूहाला त्यांच्याविषयी विश्‍वास वाटत आहे. आणखी एक मोठे कारण या मागे आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक कारणांमुळे भारिपचा एक स्वत:चा सामाजिक-राजकीय पाया उभा राहिला आहे. त्यासाठी मागील 35 वर्षे त्यांनी अथक, सातत्यपूर्ण कष्ट उपसले आहेत. यामुळे त्यांना व पक्षाची बांधिलकी मानणारा एक मोठा कार्यकर्ता समूह आणि सामान्यांचा मोठा जनसमूह उभा राहिला आहे. ती नुसती गर्दी नाही. अनुसूचित जातिंपैकी किमान 50% लोकांची मते ते घेतात. काँग्रेस-भाजप-सेना वगळून एवढी गर्दी व मते घेणारा फुले-आंबेडकरी परिघातील भारिप बहुजन महासंघ व बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत. ते सातत्याने स्वतंत्र प्रज्ञेने फुले-आंबेडकरी विचारांचा आताच्या संदर्भात अन्वयार्थ लावत आलेले आहेत. त्यानुसार आपले समाजकारण-राजकारण करीत आलेले आहेत.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही विविध रिप. पक्ष आणि त्याहीपेक्षा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारिपसोबत सर्वाधिक महिला रस्त्यावर आहेत. किंबहूना बहुजन महिलांची मोठी फौज त्यांच्यासोबत आली आहे. त्यांच्या या धोरणामुळे धनगर, माळी, भिल-गोंड-आदिवासी, पारधी, टाकणखार, कुणबी, बौध्द, कुणबी, मुस्लीम, मातंग, पानमळेवाले-बारी, बंजारा, कोळी, तेली, आदी पुरुष-महिला उमेदवार सर्व पातळीवर निवडून आले. आज ओबीसी-भटके विमुक्त आणि आता मुस्लीम, लिंगायत-धनगर-मराठा-आदिवासींमधील कष्टकरी समूह त्यांच्यामागे उभा राहयचा प्रयत्न करत आहे. अर्थात तो स्वतंत्रपणे त्यांच्यामागे उभा राहत नाही, तर त्यांच्या-त्यांच्या समाजातील, जिल्यातील प्रतिनिधी, नेत्यांमार्फत ते बाळासाहेबांच्या मागे  उभा राहत आहे. तो एकदम फुले-आंबेडकरी विचार समजून-उमजून येणारच नाही.

  मंडल आयोगाच्या स्वीकृतीनंतर एक मात्र झाले की, हे सारे समाज हळूहळू फुले-आंबेडकरांविषयी आदर-जवळीक दाखवू लागले आहेत. त्यांच्या-त्यांच्या समाजाच्या कार्यक्रमांत त्यांच्या समाजाच्या नेत्यांसोबतच आंबेडकरांचा फोटो लावत आहेत. याचवेळी बाळासाहेबांकडे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक निश्‍चित अशी सामाजिक-राजकीय मते स्वत:च्या समाजातील उमेदवाराला मिळवून घेण्याच्या किमान विचाराने ते भारिपजवळ येत आहेत. ही अवस्था काही काळ राहणार आहे.  1995पासून एक निश्‍चित दिसत आहे की, खासदार, आमदारकीच्या निवडणुकीत भारिपचे उमेदवार बर्‍यापैकी मते घेतांना दिसत आहेत. एखाद दुसरा उमेदवार निवडून येत आहे. पण एक नक्की की, खाली ग्रामपंचायत, पंचायत परिषद, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकांपर्यंत चढत्या क्रमाने मते घेत आहे. तर अधिकाधिक उमेदवार निवडून येत आहेत. फुले-आंबेडकरी परिघातील भारिप हा अशी मते घेणारा एकमेव पक्ष आहे आणि बाळासाहेब हे एकमेव असे व्यापक चिंतन करणारे नेते आहेत. पण याला खरेखुरे स्थिरावणारे सामाजिक-राजकीय स्वरुप येण्यासाठी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

त्यासाठी फुले-आंबेडकरी, रिपब्लिकन, डावे-समाजवादी-परिवर्तनकारी चळवळीपलीकडचा नवा विचार-मार्ग-संघटना घेऊन पुढे जाण्याचे धाडस भारिप किती दाखवेल यावर भवितव्य अवलंबून राहणार आहे. शेतकरी-शेतमजूर, मराठा, लिंगायत, मुस्लीम, आदिवासी, धनगर, आदी समूहांच्या प्रश्‍नांवर लढे उभारत पुढे जायची क्षमता भारिप व नेते बाळासाहेबांमध्ये आहे हे नक्की. तसे सिग्नल्स बरेच समूह सर्वत्र देत आहेत. या दृष्टीनेच मराठा तरुणांच्या मनात भारिप विषयी पर्यायाने फुले-आंबेडकरी विचारांविषयी जवळीक निर्माण होईल आणि एकत्रित लढ्यांतून नवी उमेद, नवा विश्‍वास निर्माण होऊन या आत्महत्या रोखता येतील.

 

(लेखक फुले, आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. संपर्क – 9421661857 )

By | 2018-11-05T13:35:07+00:00 नोव्हेंबर 5th, 2018|Opinion|0 Comments