फुले, आंबेडकरी विचार-चळवळीचा अन्वयार्थी थांबला !

शांताराम पंदेरे

       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित व मागास असलेल्या मराठवाड्याचे मुख्य केंद्र औरंगाबादला नागसेनवन परिसरउभारताना जे स्वप्न पाहिले होते; ते प्रत्यक्षात आणून तसे संपूर्ण जीवन जगलेले प्रा. अविनाश डोळस सर वयाच्या 67 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यामुळे (दि.11 नोव्हें. 2018 रोजी) आपल्यातून निघून गेले. त्यांना प्रबुध्द भारतपरिवारातर्फे विनम्र अभिवादन!डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी नागसेन आणि मिलिंदसारखाअसावा असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न उराशी बाळगून स्वत: उभे राहून पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्यावतीने औरंगाबादला नागसेनवन उभारले होते. त्याप्रमाणे बाबासाहेबांचे विश्‍वासू सहकारी दादासाहेब गायकवाड यांना त्यांच्या भागातून विद्यार्थी या पुढे मुंबईला न पाठविता औरंगाबादला पाठवावेत असे सुचविले. त्यानुसार दादासाहेबांनी आपल्या शेजारच्या (गाव-आंबेदिंडोरी, जिल्हा-नाशिक) शंकरराव दाराजी आणि यशोदाबाई डोळस यांना त्यांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला मिलिंदला पाठवायला सांगितले. बाबासाहेबांनी तसे सांगितल्याचेही सांगितले. या आदेशाप्रमाणे अविनाश डोळस औरंगाबादला शिकायला आले. तेथेच मिलिंद कला महाविद्यालयात ते प्राध्यापकही बनले. त्यांच्या नुसत्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यांनी बाबासाहेबांचे वरील स्वप्न संपूर्णपणे पूर्ण केले आहे असेच म्हणावे लागते. आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रा. अविनाश डोळस. तसेच विद्यार्थीही उभे करायचे महत्त्वाचे काम डोळस सरांनी केले. आज त्यांचे खूप विद्यार्थी सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रांत सक्रिय आहेत. येथील प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत गरिबीतून आल्यानंतरही केवळ पोटार्थी न बनता त्याने / तिने त्यांची सामाजिक जबाबदारी ओळखून जमेल तसे आयुष्यभर कार्यरत राहिले पाहिजे अशीच बाबासाहेबांची इच्छा होती. अविनाश सरांनी आपले सारे जीवन तसे उभारले. किंबहुना नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही तब्येेतीचा कोणताही बाऊ न करता ते शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले.

फुले-आंबेडकरी बहुजनवादी विचार विकसित करण्यात मोलाचे योगदान  –

      संघ-भाजप परिवाराने 6 डिसेंबरला अयोध्येतील बाबरी मस्जिद बळजबरीने पाडली. त्यानंतर मुंबईसह देशभर अनेक ठिकाणी हिंसा उसळली. त्यावेळी एक जाणवले की, हिंसेला खतपाणी घालून ती भडकावणार्‍या शक्ती दिसत होत्या. परंतु ना सत्ता, ना विरोधी पक्ष, ना परिवर्तनवादी पक्ष-संघटना या हिंसेला रोखू शकत होत्या; ना त्या विझवू शकत होत्या. या पार्श्‍वभूमीवर फुले-आंबेडकरी विचारांचा नव्याने अन्वयार्थ लावून विशिष्ट जाती-धर्मात अडकलेली ही चळवळ बाहेर काढण्याचा विचार प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखविला. नवा फुले-आंबेडकरी बहुजन पर्याय उभा करण्याचा प्रस्तावही आमच्यासारख्या ओबीसींमधील कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यानुसार पुढे सारे घडले. त्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन भारतीय रिपब्लिकन पक्षातील (भारिप) तमाम कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपले योगदान दिले. गावात बहुजन महासंघआणि पुढे भारिप बहुजन महासंघ’ (भाबमसं) नेला. त्यावेळी भाबमसंघाच्या मागील फुले-आंबेडकरी विचारांचा नवा अन्वयार्थ राज्यभर ज्या विचारवंत-अभ्यासक-कार्यकर्त्यांनी प्रथमपासून नेला; त्यात प्रा. डोळस सरांचे खुप मोठे योगदान आहे. खूप व्याख्यानं दिली. कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरं घेतली. वृत्तपत्रे व विविध ग्रंथांमध्ये वैचारिक लिखाण केले. अनेक मोठी साहित्य संमेलनं आणि अध्यक्ष पदांवरील भाषणात साहित्यातील हा नवा संदर्भही मांडला. किंबहुना दलित साहित्य आणि फुले-आंबेडकरी चळवळ या परस्पर पूरकच आहेत हा त्यांचा नेहमीचा चिंतन आणि अभ्यासाचा आवडता विषय होता. फुले-आंबेडकरी विचारांचे ते एक प्रमुख अन्वयार्थी होते. बहुजन महासंघ स्थापन केल्यानंतर एक असा कालखंड आला; ज्यावेळी महाराष्ट्रभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना सुरू झाली होती. त्यामागे राजकीय कट असल्याचे बाळासाहेबांना जाणवले होते. त्यावेळी महाराष्ट्रभर अत्यंत स्फोटक परिस्थिती होती. या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी परिस्थिती चिघळू नये आणि सर्वसामान्यांना अशा परिस्थितीत निव्वळ भावनेच्या पलीकडच्या योग्य, संयमी भूमिकेनुसार कसे वागावे हे कळावे म्हणून फुले-आंबेडकर विद्वत सभाकाढण्याचा प्रस्ताव अविनाशसह काही विचारवंत-कार्यकर्त्यांसमोर ठेवला. बाळासाहेबांची या मागील भूमिका समजून घेवून प्रा. अविनाश डोळस यांनी या कामी पुढाकार घेतला आणि औरंगाबादला विद्वत सभेची पहिली राज्यस्तरीय ऐतिहासिक बैठक घेतली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राज्यभराचे स्फोटक वातावरण एकदम निवळले गेले. भारिपचे कार्यकर्ते किती परिपक्वतेने विचार करून कार्यरत होतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. या कामी डोळस सरांचे मोठे योगदान आहे.

अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्टग्रंथातील विचारांचा पगडा  – 

     फुले-आंबेडकरी चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्टया ग्रंथाचा जबरदस्त प्रभाव आहे. शंभरावर वर्षे होवूनही आज हा ग्रंथ व त्यातील विचारांचे महत्त्व उत्तरोत्तर वाढत आहे. डोळस सरही यात मागे कसे राहतील? त्यांनी मिलिंदला शिकवित असतानाही ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी यांच्यासोबत आंतरजातीय, धार्मिक, भाषिक इच्छुक तरुण-तरुणींची लग्नं लावत असत. सर्व प्रकारचा धोका पत्कारून डोळस सर हे सारे करत असत. ही एक समतेच्या विचारांची चळवळ बनली होती. आणि औरंगाबाद हे याचे एक केंद्र होते.

 

अशिक्षित-कष्टकरी आंबेडकरी पिढीशी सुसंवाद-एकोपा राखण्यात यश –

       प्रा. अविनाश डोळस हे बाबासाहेबांनंतरच्या पहिल्याच शिक्षित पिढीचे प्रतिनिधी. त्यांचे शेतकरी आई-बाबा खूप कष्टाळू आणि अशिक्षित. अविनाशचे लग्न एका अँग्लो इंडियन, ख्रिश्‍चन, शिक्षिका जॅकलिन स्मिथ यांच्याशी झाले. फक्त इंग्रजी आणि जेमतेम हिंदी भाषा येणारी जॅकलीन आणि फक्त ग्रामीण मराठी येणारी अविनाशच्या आई यांच्यातील सुंदर सुसंवाद ठेवण्याची जबाबदारी अविनाश डोळस यांनी चांगली सांभाळली. त्यामुळे शेवटपर्यंत सासू-सुनांमध्ये खूपच चांगला संवाद राहिला.

विद्यापीठ नामांतर, मंडल आणि गायरान जमीन हक्क आंदोलनात आघाडीवर –

      80च्या दशकात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला हे आंदोलन औरंगाबाद केंद्रित होते. सगळीकडून सारे नामांतरवादी येथे येत होते. अशावेळी नामांतराच्या मध्यवर्ती कार्यालयातील निर्णय प्रक्रियेत अविनाशजींचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनात बिगर बौध्द, बिगर दलितांचा सहभाग वाढावा म्हणून जी नामांतरवादी नागरिक कृती समिती स्थापन करून जे जाणीवपूर्वक प्रक्रिया-प्रयत्न केले गेले; त्यात डोळस सरांचा मोठा वाटा होता. कमालीच्या शांत, संयमी वृत्तीने समोरच्या माणसांशी ते विचारविनीमय करत असत. तोच अनुभव मंडल लढ्यात यायचा. भारिपने मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यानंतर औरंगाबादसह सार्‍या मराठवाड्यात त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध क्षेत्रांतील ओबीसी तरुणांशी संवाद केला. खूप बैठका घेतल्या.  बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 80-90च्या दशकात महाराष्ट्रात गायरान जमीन हक्कांसाठी लढा सुरू झाला. तेव्हा औरंगाबादसह मराठवाड्यात डोळस सरांनी सातत्याने सहभाग घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारने 1991 साली गायरान जमीन हक्काचा जीआरकाढला. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात या प्रश्‍नावर सक्रिय असलेल्या युक्रांद संघटनेच्या कार्यक्षेत्रातील बाबरा या गावात जिल्ह्यातील पहिल्या 7/12चे वाटप भारिपचे सहकारी प्रा.अविनाश डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. वैचारिक क्षेत्रापासून प्रत्यक्ष कार्यक्षेत्रापर्यंत डोळस सर वावरत होते. यांचा सुरेख मेळ त्यांनी घातला होता. मराठवाड्यात ‘‘एक गाव, एक पाणवठा’’ आणि विषमता निर्मूलन समितीमध्येही सरांची भूमिका महत्त्वाची होती.

 

चौफेर व्यक्तिमत्व –

     प्रा. अविनाश डोळस यांचे चौफेर व्यक्तिमत्व होते. 80च्या दशकात मिलिंद कला महाविद्यालय हे सामाजिक-दलित सांस्कृतिक-नाट्य-साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र राहिले. दलित साहित्य, नाटकाची संकल्पना समोर आल्यावर याच्या प्रांगणात प्रा. डोळस सर व त्यांचे कॉलेजचे सहकारी अगदी सहजपणे त्यानुसार विविध प्रयोग करीत होते. ते स्वत: नाटक लिहायचे. दिग्दर्शन करायचे. कथा, लेख लिहीत असतानाच अस्तित्वसारख्याऐतिहासिक नियतकालिकेचे प्रकाशनही करत होते. त्यासाठी घरातील प्रथम शिकून नोकरीला लागलेले सर या सार्‍या प्रयोगशील क्षेत्रात वावरत होते. औरंगाबादच्या मिलिंद कला महाविद्यालय  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर सरांनी काम केले होते. कोकणापासून गडचिरोलीपर्यंत डोळस सरांची अनेक व्याख्यानं झाली होती.

दलित युवक आघाडी स्थापन करण्यात सहभाग  –

     महाराष्ट्रात दलित पँथरसारखी तरुणांची जबरदस्त आकर्षक-आक्रमक चळवळ उभी राहिली होती. अशा वेळी सर आणि त्यांचे मराठवाड्यातील सहकारी मिळून दलित युवक आघाडी (दयुआ) स्थापन करून फुले-आंबेडकरी विचारांचे सम्यक दृष्टीने आकलन करीत होते. त्यामुळे त्यांचे साम्यवादी, समाजवादी-युक्रांद-राष्ट्र सेवा दल, आदी चळवळी-विचारांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा सहज, सुंदर संवाद होत होता. केवळ दोस्तीच नाही, तर विविध विचारांवर सखोल चर्चाही होत असे. त्यांचे सर्व धर्म, जाती विचारांतील सहकारी होते. विचार व कृतीच्या पातळीवर ते कधीच बंदिस्त नव्हते. त्यामुळेच पुढे बाळासाहेबांनी भारिप बमसंची उभारणी करीत असताना वर म्हटल्याप्रमाणे सर सहजपणे या सर्व उपक्रमांत आघाडीवर राहिले.

सर्वांचा चाहता उमेदवार – प्रा. अविनाश 

     1998च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन ऐक्यहोतं. त्यावेळी औरंगाबादची जागा भारिप बमसंला सुटली होती. आधी म्हटल्याप्रमाणे पक्षाने प्रा. अविनाश  डोळस यांना तिकीट दिले. त्यावेळी औरंगाबादच्या साम्यवादी, समाजवादी व परिवर्तनवादी पक्ष-संघटनांनी आनंदाने सरांसाठी काम करायची तयारी दाखविली. या निवडणुकीत नियोजन, आर्थिक व्यवहार, आदी जबाबदारी डोळस सरांनी माझ्यावर सोपविली होती. या निवडणुकीसाठी काही निधी काही मित्रांनी गोळा करून दिला होता. त्याचे काटेकोर नियोजन करत करत निवडणूक आटोपली. त्यावेळी सरांना 90 हजार मते मिळाली होती. घरचे खावून, कधी-कधी स्वत:च्या मोटार सायकल व कारमध्ये पेट्रोल, डिझेलही सहकारी भरत होते. कार्यालयातील झुणका-भाकर खात होते. निवडणूक निकालानंतर सर व मॅडम यांनी जिल्ह्यातील प्रमुख अशा सुमारे 250 कार्यकर्त्यांना औरंगाबाद येथील आताचे घर  असलेल्या प्लॉटवर एकत्र बोलाविले. व उरलेल्या निधीतून सर्वांना जेवण दिले व आभार मानले. जिंकलेला उमेदवार कार्यकर्त्यांना परस्पर ढाब्यावर भावनेचा ओलावा नसलेले कोरडे जेवण देतात. इथे पडलेला आपला उमेदवार जेवण देतो आणि सर्व आर्थिक हिशोब मांडतो. हा अनुभव सार्‍यांना खूपकाही सांगून गेला. सार्‍यांशी असलेला जिवंत संवादाचा हा सकारात्मक  परिणाम अनुभवायला मिळाला.

वंचित बहुजन आघाडी विषयीचे चिंतन –

    प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडी स्थापन करून महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी चर्चा घडविली आहे. त्याचबरोबर विविध प्रस्थापित वृत्तपत्रे आणि टि.व्ही. चॅनल्सनी या प्रक्रियेविरुध्द जोरदार मोहिमही उघडली आहे. अशावेळी आपण महासंघाच्या काळात जशा जबाबदार्‍या घेवून सातत्याने लिखाण केले होते; तसे पाऊल आता उचलावेसे वाटत आहे. त्याविषयी बाळासाहेबांशी बोलणार आहे. असा विचार बोलून दाखविला होता. आणि चार दिवसांपूर्वीच हा प्लान त्यांनी बोलून दाखविला होता. इतका फुले-आंबेडकरी राजकीय चळवळीविषयी सातत्याने विचार-कृती करणारे सर होते.

साहित्याची स्वतंत्र दृष्टी –

    मागील काही वर्षांपासून डोळस सर महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘अॅनहिलेशन आॅफ कास्ट’  या ग्रंथाच्या शताब्दी वर्षात त्याचे जातिव्यवस्थेचे निर्मूलनया नावाने मराठी भाषांतराचे पुस्तक प्रकाशित करण्यात सरांचा पुढाकार होता. तसेच डॉ. बाबासाहेबांच्या चित्रमय चरित्राचा मोठा खंडही प्रकाशित केला आहे. अनेक माहीत नसलेले फोटो यात देण्यात आले आहेत. डोळस सरांची या साहित्याकडे पाहायची स्वतंत्र दृष्टी दिसून आली. या निमित्ताने सरांची नुकतीच भेट झाली. त्यात त्यांनी बाबासाहेबांच्या साहित्याची पुनर्मुद्रणाची मोठी, आव्हानात्मक योजना आखल्याचे नुकतेच सांगितले होते. सरांच्या प्रेरणादायी स्मृतींना विनम्र अभिवादन ! जय भीम !! 

 

By | 2018-11-16T09:12:42+00:00 नोव्हेंबर 16th, 2018|Opinion|0 Comments