अराजकीय आंबेडकरी लोकांपासून सावध व्हा

भाग – 2

 – डॉ. संदिप नंदेश्वर

      कारण अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अगदी 2012 पासून बदलणार्‍या परिस्थितीचा आढावा घेऊन आरएसएस व हिंदुत्ववाद्यांविरुद्ध लढत आहेत. अगदी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी (हिंदुत्वप्रणीत) ध्येयधोरणाच्या विरोधात प्रकाश आंबेडकर लढत होते. इतक्यात हैद्राबादचे ‘रोहीत वेमुला’ प्रकरण घडले व त्याचबरोबर दिल्लीचे जेएनयु प्रकरण घडले. याही प्रकरणात अगदी सुरुवातीलाच उडी घेऊन प्रकाश आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना आश्‍वस्त केले. काँग्रेस असो वा अन्य पक्ष असो किंवा सोकॉल्ड आंबेडकरी नेते व पक्ष सरकारी बिळात दडून बसले असताना प्रकाश आंबेडकरांनी एकहाती मोर्चा सांभाळला. मुंबई व दिल्लीतील तरुणाईच्या मोर्चाने त्यांचे नेतृत्व सिद्धही केले. परंतु तरुणाईचा बदलता चेहरा लक्षात घेऊन स्वतःचे नेतृत्व पुढे न करता नव्या तरुणांना या सरकार विरोधातल्या लढाईचे नेतृत्व करायची संधी प्रकाश आंबेडकरांनी दिली. परंतु इतक्या व्यापक होत जाणार्‍या लढ्यात व आंबेडकरी चळवळीची व्यापकता वाढत असतानादेखील काही अ-राजकीय आंबेडकरवाद्यांनी सत्ताधारी मानसिकतेचे (हिंदुत्ववादी) बळी पडून कन्हैय्याच्या आंदोलनाला व एकूणच त्याला पाठिंबा देणार्‍यांच्या विरोधात संशयकल्लोळ निर्माण केला.

विरोध करणार्‍यांत सारेचे सारे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारेच होते व आहेत. ज्यांना राजकीय भूमिका नाही, ज्यांना राजकीय समज नाही अशांनीच हा संशयकल्लोळ निर्माण केला. कुठलाही राजकीय कार्यकर्ता कन्हैय्याला पाठिंबा देणार्‍यांच्या विरोधात नव्हता. विरोधात होता व आहे तो बीजेपी आरएसएस व त्यांच्या समर्थनातील पक्ष संघटना व हा सो कॉल्ड अ-राजकीय आंबेडकरी. ज्याला देशांतर्गत राजकीय घडामोडीची जाण नाही. सर्व राजकीय पक्ष एकजूट होऊन बीजेपी, आरएसएस शासनाच्या विरोधात उभे होत असताना हेच अ-राजकीय आंबेडकरी बीजेपी आरएसएस व तत्सम संघटनांनी जो मोर्चा उघडायला पाहिजे होता तो यांनीच उघडला. मग हे आंबेडकरी चळवळीच्या विरोधात जाऊन विद्वत्ता व संशयकल्लोळ माजवून आंबेडकरी मांडलिकत्व स्वीकारणारे अ-राजकीय आंबेडकरी समाजद्रोही नाहीत का? परिस्थितीला हेरून चळवळ चालविली गेली, तर ती सर्वव्यापक होईल. विचारांचे मांडलिकत्व स्वतःकडेच ठेऊन विचाराची व चळवळीची सर्वव्यापकता संपविणारे हे सारेच अ-राजकीय का दिसून येतात? याचे कारण राजकीय अज्ञान हेच आहे. अ-राजकीय म्हणून बुद्धिभेद करणारे यांना कुठल्या व्याख्येत बसवायचे? हा विचार आपणच करायचा आहे. माझ्या दृष्टीने हे समाजद्रोह्यापेक्षा कमी नाहीत. आंबेडकरी माणसाला स्वतःला अ-राजकीय म्हणविण्यात गर्व व अभिमान का वाटावा? हा चिंतनाचा विषय आहे. जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर इथल्या राजकीय व्यवस्थेला मार्गदर्शक ठरतात. आंबेडकरी विचार सत्तेला पर्यायी व मार्गदर्शक वाटतात. भारतीय नागरिकांना राजकीय बदलाचा व शासकीय ध्येयधोरणाचा पर्याय म्हणून आंबेडकरी विचार पर्यायी व जवळचे वाटतात. तिथे आंबेडकरी अनुयायी म्हणविणारे अ-राजकीय माणसे, संस्था, संघटना, मंडळे आंबेडकरी कसे असू शकतात. कुठेतरी, काहीतरी आमचे चुकतेय. राजकीय निर्णयक्षमता पंगू झालीय याचेच हे द्योतक नाही का? ही परिस्थिती कुणी निर्माण केली असेल, तर ती इथल्या स्वतःला आंबेडकरी म्हणविणार्‍या भाषणकार, प्रबोधनकार, गायक, नोकरदार, लेखक, कवी व सो कॉल्ड समाजसेवकांनी व संस्था, संघटना, मंडळे चालविणार्‍या तमाम अ-राजकीयांनीच केली आहे. कधीच कुठलीही ठाम राजकीय भूमिका न घेणार्‍यांनी ही परिस्थिती निर्माण केली. असे म्हणणे यात काहीही गैर नाही. यावर निरपेक्ष भावनेतून विचार व्हावा. राजकीय भूमिका घेणे म्हणजे राजकीय पक्षात काम करणे किंवा त्या पक्षाचा सदस्य असणेच असे नव्हे. तर कुठल्यातरी राजकीय विचारांची व त्या विचारधारेवर चालणार्‍या पक्षाची बांधिलकी स्वीकारून ती विचारधारा व तो पक्ष जनमानसात प्रसारित व प्रचारित करून मतदार व लोकशाहीतील नागरिक या नात्याने मतदान पेटीतून त्या विचाराची राजकीय ताकद निर्माण करणे होय. एखादा पक्ष स्वीकारत असताना त्या पक्षाच्या उत्पत्तीमागे असणारी विचारधारा आपण स्वीकारित असतो. व तिच आपली राजकीय भूमिका म्हणून पुढे येते. याचा परिमाण सूत्राच्या आधारे लोकशाहीचे बळकटीकरण होऊ शकते. आम्ही त्या प्रत्येकच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो ज्यांनी एखादा राजकीय पक्ष, नेतृत्व व विचारधारा स्वीकारली आहे. निदान लोकशाहीतील नागरिक असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. मग ते भाजपाचे कार्यकर्ते असोत वा काँग्रेसचे कार्यकर्ते असोत. त्यांची राजकीय भूमिका ते सिद्ध करीत आहेत. व जनमानसात पोहचवित आहेत. स्वतःला आंबेडकरी म्हणविणार्‍या परंतु बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य राजकीय पक्षात काम करणार्‍यांचे व त्यांच्या हितसंबंधियांचेही आम्ही स्वागत करतो. परंतु त्यांनी समाजाला गफलतमध्ये न ठेवता स्पष्टपणे समाजासमोर मांडावे; की आम्ही त्या पक्षाच्या विचारधारेला स्वीकारले आहे. फक्त तो पक्ष स्वीकारला. विचारधारा स्वीकारली नाही. असे आठवले स्टाईलने समाजाला फसवू नये. अ-राजकीय व अपक्षीय लोकांपेक्षा इतर पक्षियांसोबत काम करणारे कधीही चांगले. कारण त्यांचे राजकीय शिक्षण त्यातून होत जाते. व राजकीय प्रगल्भता आली की, समाजाला कधीतरी ते उपयोगी ठरतातच. परंतु अ-राजकीय व अपक्षिय हे समाजाला नेहमीसाठीच धोकादायक असतात. हे लोकशाहीत वावरणार्‍या समाजाला, तर जास्तच धोकादायक आहे. आंबेडकरी चळवळीतील राजकारणाचे तीनतेरा वाजले. फाटाफूट झाली. गटबाजी झाली. अशा सबबी पुढे करणारे अ-राजकीय नेमके विरोधी पक्षांच्या हातातील बाहूले आहेत हे ओळखावे. समाजाला भ्रमित करून विरोधी पक्षाला लाभ पोहचविणारे आहेत हे समजावे. जो व्यक्ती स्वतःला आंबेडकरी म्हणवितो त्या प्रत्येकच व्यक्तीचे राजकीय अंग असायलाच पाहिजे. राजकीय अंग नसलेला आंबेडकरी असूच शकत नाही. तो आंबेडकरी मुखवटा घेतलेला बहुरूपी आहे हे लक्षात घ्यावे. या देशाला लोकशाही शासनव्यवस्था व संसदीय स्वरूप देणार्‍या बाबासाहेबांना मानणारा माणूस (मतदार) अ-राजकीय कसा राहू शकतो? परंतु असा बुद्धिभेद करणार्‍यांना आंबेडकरी तरुणांनी वेळीच ओळखले पाहिजे व यांचा बुद्धिभेद संपवून चळवळीची होणारी हानी थांबविली पाहिजे. आंबेडकरी समाज गटातटात का विभागला? असा प्रश्‍न करून काही लोक बुद्धीची दिवाळे काढतात. या लोकांनी चळवळीचा अभ्यास करावा. संपूर्ण आंबेडकरी समाज गटातटात विभागला हे साफ खोटे आहे. गटातटात विभागलेला समाज 10% असेल, तर इतर विरोधी पक्षियांसोबत काम करणारा 90% आहे. हे तपासायचा सोपा मार्ग आहे. या महाराष्ट्रात 3 करोडच्या जवळपास आंबेडकरी मतदान आहे. सर्व आंबेडकरी गट-तट-पक्ष यांना मिळणार्‍या मतदानाची बेरीज केली, तरी ती 10 ते 15 लाखांच्या वर जात नाही. मग उरलेले आंबेडकरी मतदान कुठे गेले? याचे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे समाजापुढे उत्तर देतील का? की यांनीच हे उर्वरित मतदान आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना व नेतृत्वांना शिव्या देऊन अन्य पक्षांकडे वळते केले? हे तरी सांगतील का? हे विचारण्याची वेळ आता समाजापुढे आली आहे. ही इतकी मोठी तफावत असण्याला जबाबदार कोण? तर हा स्वतःला अ-राजकीय म्हणणारा व राजकीय भूमिका न घेणारा नोकरदार, प्रबोधनकार, लेखक, कवी, गायक, भाषणकार आहे. कारण हा समाजात आपली भूमिका मांडत असताना आंबेडकरी राजकीय पक्षाची वा नेतृत्वाची भूमिका न मांडता शेखचिल्लीसारखे स्वप्नवत राजकीय पक्षाची भूमिका मांडतो. जसे काही राजकीय पक्ष कसा असावा? त्याने काय करावे? कुठली भूमिका घ्यावी? नेता कसा असावा? त्याने काय करावे? कसे वागावे? इ. इत्यादी प्रश्‍नांची उत्तरे हेच समाजाला देतात. जणू खुद्द बाबासाहेब रोज यांच्या कानात येऊन सांगतात. असेच यांचे वर्तन असते. ही शेखचिल्लीची स्वप्न रंगविणारे व स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे समाजद्रोह्यांपेक्षा कमी नाहीत. ज्यांनी अख्खा समाज वेठीस धरला. व समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविले. तेव्हा अधिक काळ गप्प राहिलात, तर सत्तेवर बसलेली विचारधारा तुम्हाला कायमची संपवून टाकेल. याचा गांभीर्याने विचार व्हावा. अ-राजकीय असणार्‍यात मोठी संख्या ही शिक्षित वर्ग, नोकरदार, भाषणकार, साहित्यकार, प्रबोधनकार, लेखक, कवी, व पोटभरू समाजसेवक यांची आहे. काही अपवाद वगळता या सर्व वर्गाने कधीही राजकीय भूमिका घेतली नाही व समाजासमोर ती भूमिका मांडली नाही. प्रत्येकजण आपापल्या पोटापाण्याची सोय पाहू लागला. हाच वर्ग आहे, जो स्वतःला ‘प्रति-आंबेडकर’ समजून समाजाला विचलित करीत राहिला. सातत्याने समाजात संभ्रमावस्था निर्माण करीत राहिला व समाजात राजकीय नैराश्य पसरवून आपली भूक भागवू लागला. त्यातले काही आपण रोजच आपल्या आजूबाजूला अनुभवत असतो. त्यातले काही उदाहरणा दाखल…

1) नोकरदार :

    हा वर्ग नोकरी पेशात वावरणारा, महिन्याकाठी पगार घेणारा, समाजात मान सन्मानाने जगणारा. ज्यात बाबू पासून अधिकार्‍यांपर्यंत ते प्रोफेसर पासून ते शिक्षकांपर्यंत, तर डॉक्टर, वकील, इंजिनिअरपर्यंत. यांचा आंबेडकरीझम प्रमोशन, बदल्या पर्यंतच. समाजातला क्रिम वर्ग, पण स्वतःच्या निश्‍चित कप्प्यात जगणारा. ठोस सामाजिक व राजकीय भूमिका यांच्या पाचविला कधीच पूजत नाही. समाजात बाबासाहेब आम्हीच वाचला असे दाखवून लोकांकडून मानसन्मान मिळवून घेणे. हाच यांचा परमोधर्म. परंतु सत्ताधारी, राजकीय पक्षात अतिशय जुगाळू म्हणून प्रसिद्ध. यांना बाबासाहेबांच्या विचारावर चालणार्‍या पक्षात काम करा! असे म्हटले की, आम्हाला राजकारण करता येत नाही. पक्षाचे काम करता येत नाही. हे ठेवलेले पाठांतरित उत्तर. कुठल्या कायद्याने तुम्हाला राजकीय काम करता येत नाही? हे विचारले, तर निरूत्तर. या देशाच्या संविधानाने राजकीय अधिकार दिले असताना यांना राजकीय भूमिका न घेणे, ही पळवाट आहे. कुठल्याही नोकरदार माणसाला कुठलाही कायदा राजकीय भूमिका घेण्यापासून रोखू शकत नाही. फक्त निवडणूक काळात प्रचार सभेतून राजकीय प्रचार प्रतिनिधित्व कायद्याने करता येत नाही. अन्य काळात समाजात तुम्ही तुमची राजकीय भूमिका घेऊन समाजाला मार्गदर्शन करू शकता. पण आजपर्यंत हे असे कधी करताना दिसले नाही. निवृत्त झाले की, लगेच यांना चळवळीचा कळवळा येतो. व नंतर हेच आपले विचार समाजावर थोपू पाहतात. हे अराजकीय नोकरदार या आंबेडकरी चळवळीची पिछेहाट होण्यात कारणीभूत नाहीत का ? मग यांना आम्ही अराजकीय आंबेडकरी समाजद्रोही का म्हणू नये.

2) प्रबोधनकार :

     हा एक विचित्र वर्ग. यांची स्वतःची काही भूमिकाच नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा वर्ग. जिथे बोलवाल, तिथे जाऊन त्या पक्षाचे व नेतृत्वाचे गुणगाण करेल. यांना 60-70 ते 1 लाख रुपयापर्यंतच्या मानधनाशी तेवढे देणेघेणे आहे. यातले काही 5 हजार ते 10 हजार घेणारेही आहेत. काही 10 हजार ते 50 हजार घेणारेही आहेत. पैसे घेऊन प्रबोधन हाच यांचा धंदा. आम्ही आंबेडकरी आहोत व आमची काही निश्‍चित राजकीय भूमिका असावी. असे यांना कधी वाटलेच नाही. पोटापाण्यासाठी सर्वच पक्षांशी जवळीक साधून असलेला हा वर्ग. यांनी बाबासाहेबांची राजकीय भूमिका तत्कालीन परिस्थितीत कधी मांडलीच नाही. नको त्या गोष्टी समाजात मांडून चळवळीची अब्रू चव्हाट्यावर मांडण्यात यांना असूरी आनंद मिळाला. टाळ्यांच्या गजरात यांनी तो आनंद घेतला. पण समाज चळवळीपासून व राजकारणापासून निराश बनत चालला याचे यांना देणेघेणेच राहिले नाही.

(लेखक- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील आहेत.)
मो. 8793397275
(क्रमशः)

By | 2018-11-16T10:44:37+00:00 नोव्हेंबर 16th, 2018|Once Again Ambedkar|0 Comments