अभियान मुलींना नव्या गुलामीत लोटण्याचे !

प्रा. प्रतिमा परदेशी –

      बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयु) आयआयटीमध्ये 3 सप्टेंबर 2018पासून एक कोर्स सुरू करण्यात आला आहे. कोर्सची घोषणा स्टार्टअपचे सीइओ नीरज श्रीवास्तव यांनी केली होती. ‘डॉटर्स प्राईड : बेटी बचाव मेरा अभियान’ असे कोर्सचे नाव आहे.  स्टार्टअप यंग इंडिया अंतर्गतचा हा तीन महिन्यांचा कोर्स महत्त्वाचा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मते यासारख्या कोर्समधून तरुणीच्या आत्मविश्‍वासात वाढ होईल. त्यांचे सामाजिकरण वाढेल. सदर कोर्समध्ये आत्मविश्‍वास, इंटरपर्सनल स्कील, प्रोब्लेम सोल्विंग स्कील, स्ट्रेस हँडलिंग, मॅरेज स्कील सोबत कॉम्प्युटर व फॅशन स्कील शिकविले जाणार आहे. या कोर्समधून मुली आणि महिला व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षक, फॅशन डिझायनर व समुपदेशक म्हणून काम करू शकतील असेही सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कोर्स वनिता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनमध्ये शिकविला जाणार आहे.

      बेटी बचाव…अशा विषयावर आधारित एखादा शैक्षणिक उपक्रम असायला अजिबात हरकत नसावी. पण अभ्यासक्रमाचा तपशील, संयोजक  शैक्षणिक संस्था आणि त्यांचा उद्देश पाहता धडकी भरल्या शिवाय राहत नाही. धडकी भरण्याचे पहिले कारण म्हणजे बीएचयुच्या पुढाकारचे. काही महिन्यांपूर्वीच ही संस्था विद्यार्थिनींशी असभ्य वर्तनासंदर्भात लक्ष्य ठरली होती. ही एक कर्मठ भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संस्थेत सनातनी विचारधारेच्या प्रभावामुळे लिंगभेदाची वागणूक सातत्याने दिली जाताना दिसते. विद्यापीठात अपेक्षित ज्ञानव्यवहाराला इथे तिलांजली दिली जाताना दिसते. रूढीवादी लोकांच्या वर्चस्वाखालील या विद्यापीठाने कायम आपल्या विद्यार्थिनींना किमान अधिकारांपासून वंचित ठेवण्याचेच काम केलेले आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांसाठी अडथळे उभे केले जाणे हा येथील नित्यपाठ आहे. या युनिव्हर्सिटीत शिकणार्‍या मुलींसाठी, एक वेगळी नियमावली आहे. हे नियम खास विद्यार्थिनींसाठी बनवले गेलेत आणि ते नियम पाळणे विद्यार्थिनींसाठी बंधनकारक केलं गेलय. विद्यार्थिनिंनी वसतिगृहात कसे राहावे पासून ते विद्यापीठ प्रशासनाबरोबर कसा संपर्क साधावा या प्रत्येक गोष्टीसाठी या विद्यापीठाने मुलींसाठी आचारसंहिता बनवली आहे. विद्यापीठाच्या चालकांची मानसिकता आणि वर्तन सरळ सरळ भेदभावाचे आहे. 21 सप्टेंबर 2017 रोजी या विद्यापीठात छेडछाड व लैंगिक अतिक्रमणाची एक घटना घडली होती. त्याविरोधात तीव्र पडसाद उमटले. खरे तर तो  आजवर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या स्त्रीविरोधी भूमिका, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक या विरोधातील असंतोष होता. ही घटना 21 सप्टेंबर 2017ची आणि 3 सप्टेंबर 2018पासून बेटी बचाव… कोर्स सुरू होणे हा योगायोग नाही. साधारण वर्ष भरात मलीन झालेली प्रतिमा उजळवण्याचा हा एक प्रयत्न असावा असे काही लोकांना वाटू शकते. पण एवढी, तरी संवेदनशीलता यांच्या कडे आहे का?  याचे उत्तर कोणीही सुज्ञ माणूस अर्थातच नाही असेच देईल.

     एकीकडे मुलीना, स्त्रियांना सातत्याने संस्कृतीचे प्रतीक म्हणून पुढे आणायचे, जातपुरुषसत्ताक संरचनेतील स्त्रियांच्या दुय्यम भूमिकांचे उघड समर्थन करायचे, त्यांना उपभोगाची वस्तू मानायचे, उपयुक्त जिन्नस समजणार्‍या विचार परंपरांचे समर्थन करणार्‍यांकडून कोर्स डिझाईन होताना धडकी भरतेच. समाजात स्त्रिया असुरक्षित बनत चालल्या आहेत, हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत अशा वेळी छोटे छोटे कोर्स आणि तेही जातपुरुषसत्ताक चौकटीत बनविण्याऐवजी स्त्री अभ्यास केंद्रे अधिकाधिक निर्माण करणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देऊन कार्याची स्वायतत्ता देणे गरजेचे आहे. या संदर्भात अशी केंद्रे बंद पडण्याची धोरणे वेगवेगळ्या पद्धतीने आखली जाताना दिसत आहे. एकीकडे स्त्री अभ्यास केंद्र बंद पडणे आणि दुसरीकडे बेटी बचाव… सारखे निव्वळ प्रचारकी कोर्स सुरू करणे या मागील राजकारण आपण निट समजून घ्यायला हवे.  बेटी बचाव… म्हणण्याची वेळ का आली याची समाजशास्त्रीय कारणमीमांसा समजून न घेता मुली वाचवता येणार नाही हे ठामपणे सांगितले पाहिजे. जातपुरुषसत्ताक परंपरांना धक्काही न लावता बेटी नाही वाचता येत इतकेही शहाणपण नसणारे कोर्स तयार करतात ही चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. स्त्रीवादी अभ्यासाला या निमित्ताने मोठे आव्हान उभे राहत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘डॉटर्स प्राईड’ ही संकल्पना तर सोडाच हा शब्दही सनातन संस्कृतीत बसत नाही. शब्द, संकल्पनांची चोरी करणे, समतामूलक शब्द, संकल्पना भ्रष्ट करण्याची सुरुवात अशा कोर्सच्या माध्यामतून होत आहे. ‘वंशाचा दिवा’ ही तुमची धारणा आहे, ‘डॉटर्स प्राईड’ नाही. ‘वंशाचा दिवा’ ही चुकीची, अन्यायमूलक, भेदावर आधारित विचारधारा आहे हे दडवून ‘डॉटर्स प्राईड’ नाही म्हणता येत. परंपरेच्या चौकटीत बेटी बचाव… कोर्स येतो. तो लिंगभेदभावाचे सत्ताकारण, समाजकारण उलगडून न दाखवता शिकता येणार नाही. आणि शिकवला तर त्याचा उपयोग शून्य आहे. आंबे खावून मुलगा होतो, बायकांची अक्कल चूल आणि मूल इथ पर्यंतच, स्त्रिया म्हणजे जननयंत्र ते तुम्हाला आवडलेली मुलगी सांगा तिला उचलून आणतो… अशा अनेक विधानांमागील नेमका कोणता मूळ विचार कार्यरत असतो हे समजण्याची वैचारिक क्षमता विकसित करणारे अभ्यासक्रम गरजेचे आहेत. त्यातून स्त्रियांमधला आत्मविश्‍वास वाढू शकतो. अच्छी बहु बनण्याच्या प्रशिक्षणांतून नव्हे! ही तर स्त्रीवादाला दिलेली तिलांजली!

      कोर्समधून तरुणी आणि स्त्रियामधील आत्मविश्‍वास वाढेल आणि त्यांचे सामाजिकरण वाढेल असा भलताच दावा करण्यात आला आहे. स्त्रियांचे सामाजिकरण कुंठीत कोणी केले आहे. गर्भातच तिला मारून टाकणार्‍या जातपुरुषसत्ताक मनोवृत्तीने. 21व्या शतकात सार्वजनिक जीवनात त्या निर्भयपणे वावरू शकत नाहीत. बलात्काराची, चारित्र्यहननाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर लटकत ठेवली गेली आहे. स्त्रिया किती असुरक्षित आहेत या संदर्भात अलीकडे भाजपा आमदार, खासदारांची मुक्ताफळे आठवली तरी सहज लक्षात येईल. प्रशांत परिचारक हे आमदार आहेत. सैनिकांच्या पत्नींचे चरित्रहनन त्यांनी जाहीरपणे केले, त्यांच्यापासून काल परवा ‘‘तुम्हाला कोणती मुलगी आवडते मला सांगा, तिला पळवून आणणार आणि लग्न करून देणार’’ अशी विधाने करणारे भाजपा आमदार राम कदम ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यांच्या सारख्यांचा विचारव्यूह संपवण्याची गरज आहे. निर्भीडपणे अशा विषमतावादी विचारांविरोधात उभे राहण्याची हिम्मत मुलींमध्ये निर्माण करणारे अभ्यासक्रम गरजेचे आहेत. इंटरपर्सनल स्कील, प्रोब्लेम सोल्विंग स्कील, स्ट्रेस हँडलिंग, मॅरेज स्कील सोबत कॉम्प्युुटर व फॅशन स्कील यातून तरुणी, स्त्रिया धीटपणे उभ्या राहू शकणार नाहीत. स्कील आणि विचारव्यूह, सिद्धांत, संकल्पना वेगळ्या असतात हे परत-परत सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. अशा स्किल्स मधून जागतिकीकरणाच्या बाजारप्रधान क्षेत्रासाठी स्त्रियांना एका विशिष्ट साच्यात घडवण्याचे काम साधले जाईल. पारंपरिक चौकटीत त्यांना स्किल्स शिकवून पुरुषसत्ताक मानसिकतेवर ओरखडाही उमटणार नाही. उलट विषम, शोषक चौकटीत त्या समजूतदार गुलाम, सुशोभित गुलाम, आधुनिक गुलाम बनविल्या जाण्याचीच ही दिशा ठरणार आहे. या अशा धोरणामागे असणारा स्त्रियांकडे बघण्याचा उपयुक्ततावादी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

     राम कदम यांचे विधान गंभीर स्वरूपाचेच आहे. जातपुरुषसत्ताक संस्कारात वाढलेल्या मुलांमध्ये जातीचा अहंगड, पुरुष म्हणून वरचढ असल्याची भावना जोपासली जात असते. त्यांना राम कदम यांचे विधान फारच आवडलेही असेल. त्यांनी तेव्हा टाळ्या, शिट्ट्याही फुंकल्या असतील. पण जात पंचायती तरुण तरुणींच्या प्रेमाच्या, लग्नाच्या अधिकारावर गदा येत आहे. आंतरजातीय प्रेम संबंधाना, विवाहांना नकार देत त्यांचे खून केले जात आहेत. रिंकू पाटील, नीता हेंद्रे, अमृता देशपांडे अशा एक ना अनेक तरुणी एकतर्फी प्रेमाच्या बळी ठरल्या आहेत, या पार्श्‍वभूमीवर राम कदम मुली पळवून आणण्याची भाषा करतात हे गंभीर बाब आहे. त्यांच्या विधानामध्ये पुरुष वर्चस्व कुटूनकुटून भरलेले आहे. मुलांना आवडलेली मुलगी; पण त्या मुलीला तो मुलगा आवडलेले आहे की, नाही याचा विचारच यात नाही. मुलींना मत आणि मन आहे हेच अशा विधानात नाकारलेले आहे. उचलून आणतो, लग्न लाऊन देतो ही विधाने स्त्रियांना एक उपभोगाची वस्तू मानणारी आहेत. मुलींची पसंती, सहमती कधी चालीरीतीनी, कधी पुरुषांनी, कधी समाजाने, तर कधी कुटुंबाने गृहीत धरायची आणि समस्त स्त्रियांना दुय्यमत्व असल्याचे अधोरेखित जायचे यातीलच हा प्रकार आहे.

     21व्या शतकात पुरुषसत्ता म्हणजे नेमके काय? ती जीवनाच्या विविध क्षेत्रात कशी कार्यरत असते, पोलीस, राज्यसंस्था, अभ्यासक्रम, घर-दार, न्यायपालिका इ.इ सर्व ठिकाणी जातपुरुषसत्ता कशी काम करते याबद्दलचे सामाजिक अभ्यास शिकविणे काळाची गरज आहे. ‘डॉटर्स प्राईड : बेटी बचाव मेरा अभियान’ शिकण्याची गरज खरेतर पुरुषांना अधिक आहे. हातात सत्ता आहे म्हणून एका पुरुषाने या कोर्सचा आराखडा तयार केला आहे. सत्तेचा इतका गैरवापर बरा नव्हे! शिक्षणाचे ब्राह्मणीकरण करण्याचा हा एक टप्पा आहे. स्त्रीवाद, स्त्रीवादी राजकारण-समाजकारण सार्वजनिक जीवनातून वजा करण्याचा हा एक डाव आहे. आता स्त्रीवाद हा शब्दकोशातील शब्द बनवण्याच्या विडा उचलणारी मानसिकता सर्वत्र दिसत आहे. त्याऐवजी बेटी, माता, जननी या शब्दांना मान्यता दिली जाण्याची ही सुरुवात असू शकेल. बेटी, माता, जननी यात ती कोणाची तरी कोणी आहे. वडिलांची लेक आहे, मुलाची आई आहे. ती मानव नाही, ती मैत्रीण नाही, सखी नाही विचारवंत तर नाहीच नाही. स्त्रियांवर विषमतामूलक ओळख लादली जात आहे. तिचे वस्तूकरण केले जात आहे. म्हणून ‘डॉटर्स प्राईड : बेटी बचाव मेरा अभियान’ या सारख्या मुलींचे गुलामिकरण करणार्‍या कोर्सचे आशय-विषय स्त्रीवादी नजरेतून मुळापासून बदलण्याचे खरेखुरे स्त्री-पुरुष समतावादी अभियान पुढे यायला पाहिजे.

(लेखिका या प्रबुद्ध भारत संपादक मंडळाच्या मासिक सत्यशोधक जागरच्या संपादक व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष आहेत.)

By | 2018-09-20T10:47:52+00:00 सप्टेंबर 20th, 2018|Gender|0 Comments